सुपरस्टार सलमान खान नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकतंच त्याने आपल्या आयुष्यात पसरलेल्या मोठ्या अफवेवर भाष्य केले आहे. अनेकदा सलमान खानवर लोकांचं करिअर बुडवलं , असा आरोप केला जातो. त्यामुळे अभिनेत्याला अनेकदा टीकेला सामोरं जावं लागतं. अशातच सलमान खानने या प्रकरणावर 'बिग बॉस १९'मध्ये भाष्य केलंय. अभिनेत्री शहनाज गिल यंदा वीकेंड का वारमध्ये सहभागी झाली होती. त्यानिमित्त तिच्यासमोर सलमानने मनातील भावना प्रकट केल्या आहेत.
सलमान खानने व्यक्त केल्या भावना
'बिग बॉस १९'च्या वीकेंड का वारच्या या एपिसोडमध्ये अभिनेत्री शहनाज गिल पाहुणी म्हणून आली होती. शहनाजने तिचा भाऊ शहबाज बदेशाच्या वाईल्ड कार्ड एंट्रीच्या वेळी सलमानला सांगितले की, ज्या प्रकारे त्याने तिची मदत केली, त्याच प्रकारे त्याने तिच्या भावाचे करिअर घडवण्यातही मदत करावी. यावर सलमान हसत म्हणाला की, "करिअर बनवणे किंवा बिघडवणे माझ्या हातात नाही." पुढे सलमानने त्याच्यावर लागलेल्या गंभीर आरोपांवर मौन सोडलं.
सलमान खानने स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणाचेही करिअर घडवण्याची खरी शक्ती केवळ देवाकडेच आहे. लोक अनेकदा म्हणतात की मी अनेकांचे करिअर संपवले आहे, पण हे खरं नाही, कारण असं करणं त्याच्या हातात कधीच नव्हतं. सलमानने पुढे तिरकसपणे सांगितलं की, 'मी कोणाचे करिअर खाल्लं आहे? जर मला कधी कोणाचं करिअर बुडवायचं असेल, तर मी माझे स्वतःचे करिअर संपवेल.' अशा शब्दात सलमानने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.