Join us

Gen Z ला रडवणारा 'सैयारा' ओटीटीवर होणार रिलीज, कधी अन् कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:43 IST

जाणून घ्या कधी आणि कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार 'सैयारा'

 Saiyaara: 'सैयारा' चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.  अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनित पड्डा (Aneet Padda) यांनी पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांवर जादू केली आहे. विशेषतः तरुणांमध्ये, या चित्रपटाची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर काही जण रडताना दिसून येत आहेत. शिवाय काही चाहते तर थिएटरमध्ये बेशुद्ध पडत असल्याच्या अनेक बातम्यादेखील समोर आल्या आहेत.  त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये सिनेमाविषयी अधिक कुतूहल निर्माण झालं आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाच्या यशाने सर्वांना चकीत केलं आहे. अनेक जण आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 

'सैयारा' चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे. 'सैयारा' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागू शकते. थिएटरनंतर आठ ते दहा आठवड्यांनी चित्रपट ओटीटीवर येतो. त्यामुळे दिवाळीत 'सैयारा' ओटीटीवर येण्याचा अंदाज आहे. 'सैयारा'ची ओटीटी रिलीज तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

'सैयारा' हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवसापासून या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केलीय. 'रेड २'  आणि 'केसरी चॅप्टर २' सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकलंय. फक्त ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० पेक्षा अधिक कोटींची कमाई केली आहे. तर जागतिक स्तरावर हे कलेक्शन ३०० कोटींपर्यंत पोहोचले आहे. 

अहान पांडे हा चंकी पांडेचा पुतण्या आणि अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. पहिल्याच चित्रपटातून त्याने आपला ठसा उमटवला आहे. तर, अभिनेत्री अनित हिनं याआधी सलाम वेंकीमध्ये छोटी भूमिका साकारली होती आणि बिग गर्ल्स डोन्ट क्राय या वेब सिरीजमध्येही ती झळकली होती. 'सैयारा'तून तिने प्रमुख अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे.

टॅग्स :सिनेमानेटफ्लिक्सबॉलिवूड