मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' (Saiyaara) सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाने दहा दिवसात २५० कोटींची कमाई केली आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा या नवोदित कलाकारांना घेऊन मोहित सूरींनी सिनेमा बनवला आणि आज तो तुफान चालत आहे. अहान आणि अनीतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मात्र मोहित सूरींना सिनेमात नवोदित कलाकारांना नाही तर बड्या स्टार्सला घेण्याची इच्छा होती. त्यांनी एका पॉवर कपलला विचारणाही केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, मोहित सूरींनी 'सैयारा' सिनेमासाठी एका रिअल लाईफ जोडीला ऑफर दिली होती. ती जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. दोघांच्या 'शेहशाह' मधली केमिस्ट्री सर्वांना आवडली होती. हीच केमिस्ट्री पाहून मेकर्सने 'सैयारा'साठी त्यांना विचारणा केली होती. मात्र काही कारणाने हे होऊ शकलं नाही. मग ऑडिशन्सनंतर अहान आणि अनीतची निवड झाली.
आदित्य चोप्रानेच दिलेला सल्ला
मोहित सूरी नुकतंच एका मुलाखतीत म्हणाले,"मला सिनेमात बड्या स्टार्सलाच घ्यायचं होतं. पण आदित्य चोप्राने मला सांगितलं की ओळखीचे चेहरे घेतलेस तर तुझा सिनेमा चालणार नाही. ही गोष्ट दोन नवोदित लोकांची आहे. यासाठी फ्रेश चेहरेच हवे." मला वाटलेलं नवोदित कलाकारांना घेण्याची रिस्क कोण घेईल? तर आदित्य म्हणाला, 'मी घेतो'. आणि अशा प्रकारे सिनेमासोबत यश राज फिल्म्सचं नाव जोडलं गेलं.
'सैयारा' रिलीज होऊन ११ दिवस झाले आहेत. सिनेमा २५० कोटी क्लबमध्ये गेला आहे. अजूनही सिनेमाची क्रेज कायम असल्याने कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.