Mohit Suri On Saiyaara Sequal: मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाला तरुण पीढीने अक्षरश: डोक्यावर घेतला. जेन-झी ची लव्हस्टोरी सांगणाऱ्या या चित्रपटाचं प्रेक्षकांसह समीक्षकांनीही तितकंच कौतुक केलं.'सैयारा' चित्रपटातील गाणी, संवाग तसंच अहान पांडे आणि अनिता पड्डा यांच्यातील केमिस्ट्रीचीही तितकीच चर्चा झाली. दरम्यान, एकंदरीत या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता सैयारा चा दुसरा भाग कधी येणार याबद्दल जाणून घेण्यास सिनेप्रेमी देखील उत्सुक होते. याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक मोहित सुरींना 'सैयारा'च्या सीक्वलबद्दल भाष्य केलं आहे.
अलिकडेच मोहित सुरी यांनी 'Instant Bollywood' सोबत संवाद साधला. त्यादरम्यान त्यांना 'सैयारा'च्या दुसऱ्या भागाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी अगदी स्पष्टपणे मत व्यक्त केलं.त्यावेळी मोहित सुरी म्हणाले, “दुसऱ्या भागासाठी कोणतंही प्लॅनिंग केलेलं नाही. सध्या हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे, जो मला एन्जॉय करायचा आहे. चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे आणि सध्या सीक्वलबद्दल कोणताही विचार केलेला नाही." अशी प्रतिक्रिया देत मोहित सुरी यांनी सैयाराच्या सीक्वलबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे काहीशी सिनेप्रेमींची निराशा देखील झाली आहे.
'सैयारा' चित्रपटाचा अजूनही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. अवघ्या ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात बक्कळ कमाई केली आहे. हा चित्रपट मोहित सुरींच्या कारकीर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रकॉर्ड्स मोडले आहेत.