Join us

चाकू हल्ल्यानंतर ३ महिन्यांनी सैफ अली खानने 'या' ठिकाणी खरेदी केलं नवीन घर, म्हणाला- "आता सुरक्षित वाटतंय.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:40 IST

वांद्रे येथील घरात चाकू हल्ल्यानंतर सैफने त्याचा मुक्काम नवीन ठिकाणी हलवला आहे (saif ali khan)

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (saif ali khan) काही महिन्यांपूर्वी वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाला. त्यानंतर सैफची सुरक्षा वाढवण्यात आली. पण आता या मोठ्या घटनेनंतर सैफने त्याचा मुक्काम नवीन ठिकाणी हलवला आहे. सैफने आता कतारमध्ये एक नवं लक्झरी घर खरेदी केलं आहे. ही मालमत्ता खरेदी केल्याची माहिती त्याने नुकतीच सर्वांना दिली आहे. विशेष म्हणजे, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर सैफने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे नवीन घर खरेदी करणं ही सैफसाठी केवळ एक  गुंतवणुक नसून, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय असल्याचं स्पष्ट होतं.

नवीन घर घेतल्यानंतर सैफ काय म्हणाला

एका मुलाखतीत सैफने या नवीन घराविषयी सांगितलं. सैफ म्हणाला, "कतारमध्ये राहणं खूप सुरक्षित आणि शांत वाटतं. मला तिथे राहून एक वेगळीच शांती आणि समाधान मिळतं." गेल्या काही महिन्यांत कुटुंबासाठी अनेक गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. कतारमधील हे घर केवळ आलिशानच नाही, तर उच्च दर्जाच्या सुरक्षा यंत्रणेने सुसज्ज असं घर असल्याची माहिती मिळाली आहे. सैफने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला निर्णयाचं त्याचे चाहते कौतुक करत आहेत.

सैफच्या नवीन सिनेमाची उत्सुकता

सैफ अली खान यांचा आगामी सिनेमा 'ज्वेल थीफ'ची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात सैफसोबत जयदीप अहलावत, निकिता दत्ता,  कुणाल कपूर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमात सैफ लुटारुच्या भूमिकेत आहे. कूकी गुलाटी आणि रॉबी ग्रेवाल यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  सैफ अली खानच्या आगामी सिनेमाची सर्वांना चांगली उत्सुकता आहे. नेटफ्लिक्सवर २५ एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 

टॅग्स :सैफ अली खान कतारबॉलिवूड