बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यानंतर त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेदरम्यान अभिनेता सैफ आणि चोर यांच्यातही झटापट झाल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर सैफचा सिक्योरिटी गार्ड आणि त्याचा ड्रायव्हर त्याच्या मदतीसाठी धावून आले, ते अभिनेत्याला रुग्णालयात घेऊन गेले.
मुंबई जॉइंट सीपी लॉ अँड ऑर्डर यांनी घटनेची पुष्टी केली आहे आणि सांगितलं आहे की, घटनेनंतर सैफला उपचारासाठी लीलावती येथे नेण्यात आलं आहे. आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला जात आहे. पोलिसांचा दावा आहे की, आरोपी सैफच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला भेटण्यासाठी आला असावा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी मोलकरणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
तपासासाठी ७ टीम तयार
या हल्ल्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी ७ टीम तयार केल्या आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि सैफच्या घरात काम करणाऱ्यांचीही चौकशी करत आहेत. डॉक्टरांनी पुष्टी केली आहे की, सैफच्या शरीरावर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले आहेत, त्यापैकी दोन जखमा खूप खोल आहेत. सैफच्या टीमने एक निवेदन जारी केलं आहे. "सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. ही पोलीस केस आहे" असं म्हटलं आहे.
पोलिसांना सैफच्या मोलकरणीवर संशय
पोलीस सध्या सैफच्या तीन कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत आहेत. पोलिसांना सैफच्या मोलकरणीवर संशय आहे, त्यामुळे प्रथम मोलकरणीवर उपचार केले जातील आणि नंतर तिचा जबाब घेतला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने प्रथम मोलकरणीवर हल्ला केला. दोघांमध्ये झटापट झाली. दोघांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सैफ अली खान त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि त्याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाच त्याच्यावर सहा वेळा हल्ला झाला.