Join us
Daily Top 2Weekly Top 5

चोरी की आणखी काही कारण? सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत या प्रश्नांनी वाढवलंय गुढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:07 IST

Saif Ali Khan Attacked: पोलीस केवळ चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा दावा करत आहेत. मात्र आरोपी घरामध्ये घरातीलच कुठल्या व्यक्तीच्या मदतीने घुसला होता का? तसेच घरातील इतर कुणी व्यक्ती त्याला ओळखत होती का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं अद्याप बाकी आहे.  

बॉलिवुड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल रात्री राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे. मात्र या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. एकीकडे पोलीस चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचं सांगत आहेत. मात्र या हल्ल्यामागे इतरही काही कारणं असू शकतात. असाही दावा केला जात आहे. त्यामुळे या हल्ल्यामागचं गुढ अधिकचं वाढलं आहे.

पोलिसांकडून सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटवल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्लेखोराला सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील एक व्हिडीओमध्ये पाहण्यात आल्याची माहिती पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांची पथके आरोपीचा शोधासाठी तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २५ ते ३० सीसीटीव्हींमधील चित्रिकरण पाहिले असून, हल्ल्यापूर्वी काही तास आधीपासून हल्लेखोर हा सैफ अली खानच्या घरात लपून बसलेला होता, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

त्यामुळेच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या डीसीपींनी जी माहिती दिली आहे त्यामधून काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असली तरी काही नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपी अपार्टमेंच्या पायऱ्यांवरून वर आल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र तो घरात कसा काय घुसला, याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. कारण आतापर्यंतच्या माहितीनुसार आरोपी घरामध्ये जबरदस्तीने घुसल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत. तसेच पोलीस केवळ चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा दावा करत आहेत. मात्र आरोपी घरामध्ये घरातीलच कुठल्या व्यक्तीच्या मदतीने घुसला होता का? तसेच घरातील इतर कुणी व्यक्ती त्याला ओळखत होती का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं अद्याप बाकी आहे.  

दरम्यान, आरोपी केवळ एकच आहे आणि त्याची ओळख पटवण्यात आली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र वांद्रेसारख्या परिसरातील उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये या चोरांनी आधीच रेकी केली होती का? त्याला कुठल्या गार्डने पाहिले नव्हते का? सैफ अली खानच्या घरात असं काही आहे जे अद्याप रहस्य बनलेलं आहे. तसेच या चोराला सैफ अली खानच्या घरातील ज्या कामवालीने पाहिलं, तिच्याकडेही तिने या चोराला कधी पाहिलं होतं? याची चौकशी झाली आहे. तसेच या सर्व प्रश्नांदरम्यान, चोर घरात घुसलाच कसा? हा मुख्य प्रश्न आहे. तसेच यामुळे या प्रकरणातील गुढ वाढलं आहे.  

टॅग्स :सैफ अली खान गुन्हेगारीबॉलिवूड