अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांची सोशल मीडियावर सतत चर्चा असते. त्यांच्या विविध मुलाखतींमधले काही क्लिप्स व्हायरल होत असतात. अनेकदा ते ट्रोलही होतात. अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांनी चक्क पिळगांवकरांचा ऑटोग्राफ घेतला होता. हा किस्सा सचिन यांनी नुकताच एका मुलाखतीत सांगितला. नक्की काय आहे तो किस्सा?
रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, "एकदा घराची बेल वाजली. माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला आणि समोर संजीव कुमार उभे होते. बाबांनी त्यांचं स्वागत केलं. मग त्यांनी विचारलं, 'सचिन आहे का? त्याला बोलवा'. मी आलो. ते मला म्हणाले, 'मी आताच हा माझा मार्ग एकला सिनेमा पाहून आलो आहे. मी आयुष्यात कधी कोणाचाही ऑटोग्राफ घेतलेला नाही. आज पहिल्यांदाच घेणार आहे. तू मला ऑटोग्राफ देशील का?' त्यांनी माझ्या पेन आणि पेपर ठेवला. मी लिहिलं, 'माय डिअर हरि भाई, विथ लव्ह सचिन."
'हा माझा मार्ग एकला' सिनेमात सचिन पिळगावकर बालकलाकार होते. तेव्हा ते फक्त ४ वर्षांचे होते. हा त्यांचा पहिला सिनेमा होता. आपल्या पहिल्याच सिनेमातून त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली होती. वयाच्या फक्त चौथ्या वर्षी त्यांनी थेट संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला ही मोठी गोष्ट होती. हीच आठवण त्यांनी सांगितली. नंतर काही वर्षांनी सचिन पिळगावकर 'शोले'मध्ये झळकले ज्यात स्वत: संजीव कुमार होते.