'रामायण' (Ramayana) या बहुप्रतिक्षित सिनेमाची जोरदार चर्चा आहे. नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेही (Adinath Kothare) आहे. तो श्रीरामाचा भाऊ 'भरत'ची भूमिका साकारणार आहे. रामायणात प्रभू श्रीराम आणि भरत मिलाप ही महत्वाची घटना होती. श्रीराम वनवासात असताना भरतला भावाला भेटण्याची ओढ असते जी त्याला श्रीरामापर्यंत घेऊन येते. तो त्यांना परत न्यायला आलेला असतो. तेव्हा दोन्ही भाऊ आलिंगन देतात हा भावुक क्षण 'रामायण' सिनेमात पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असेल. आदिनाथ कोठारेने नुकतंच एका मुलाखतीत सिनेमासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
'बॉलिवूड हंगामा'शी बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाला, "या सिनेमात काम करायला मिळणं हा माझ्यासाठी आशिर्वादच आहे. भारतीय भूमीवर बनलेला हा सर्वात मोठा सिनेमा आहे. इतकंच काय जागतिक स्तरावर बनलेला हा सर्वात मोठ्या सिनेमांपैकी एक आहे. अशा सिनेमाचा भाग होणं यासाठी मी मुकेश छाबरा यांचा कायम ऋणी आहे. त्यांनीच माझी सिनेमासाठी निवड केली आणि अर्थातच नितेश सर ज्यांनी मला भरत ही भूमिका दिली. तसंच नमित मल्होत्रा सर ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला एवढी मोठी जबाबदारी सोपवली. ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो भरत कैकयीचा मुलगा आणि श्रीरामाचा भाऊ होता."
नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांची थक्क करणारी दूरदृष्टी
आदिनाथ म्हणतो, "सिनेमाबाबतीत त्यांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट राहिलं आहे. त्यावर ते ठाम आहेत. त्यांनी पूर्णपणे नियोजन केलं आहे. या प्रोजेक्टच्या प्री प्रोडक्शनसाठीच त्यांनी जवळजवळ १० वर्ष घालवली आहेत. नितेश सरांनी २०१६-१७ मध्ये रामायण सिनेमाचा प्रवास सुरु केला. मला वाटतं नमित सर, नितेश सर लॉकडाऊनच्या आधीपासूनच व्हीएफएक्स आणि प्री प्रोडक्शनवर काम करत आहेत. फक्त कलाकार, फिल्ममेकर, माणूस म्हणून नाही तर या भव्य सिनेमाच्या निर्मितीचा भाग होणं या सिनेमात काम करण्याची संधी मिळाणं यासाठी मी स्वत:ला भाग्यवानच समजतो. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कोणतीही अभिनय कार्यशाला तुम्हाला हे शिकवू शकत नाही."
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
सिनेमाची पटकथा वाचून प्रभावित
सिनेमाची स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचल्यावर आदिनाथ थक्क झाला होता. तो म्हणाला, "मी जेव्हा स्क्रीनप्ले ऐकला तेव्हा थक्कच झालो. आता प्रदर्शन,निर्मिती व्हॅल्यू , व्हीएफएक्स आणि तपशील हे सगळं सोन्याहून पिवळं असल्यासारखं आहे. मी आतापर्यंत वाचलेल्या स्क्रिप्टपैकी ही सर्वोत्तम आहे."