Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फहाद फासिल'च्या पुढच्या चित्रपटाचं नाव आलं समोर, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 18:38 IST

इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमात फहादसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी झळकणार आहे.

सध्या सगळीकडे एका व्यक्तीची चर्चा सुरू आहे, तो काही नायक नाही तर खलनायक आहे. तो म्हणजे 'पुष्पा २' सिनेमातील 'भंवर सिंग शेखावत' अर्थात फहाद फासिल (Fahad Faasi). 'पुष्पा' आणि 'पुष्पा २'  या दोन्ही सिनेमात अल्लू अर्जुनपेक्षा खलनायक असलेला फहाद फासिल जास्त भाव खावून गेला.  फहाद फासिलच्या अभिनयाला खूप पसंती दिली जात आहे. लवकरच तो इम्तियाज अलीच्या आगामी रोमँटिक सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं नावही समोर आलं आहे. 

इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमात फहादसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी झळकणार आहे. त्यामुळे फहाद-तृप्ती या वेगळ्या जोडीचा रोमान्स बघायला सर्व उत्सुक असतील. या सिनेमाचं नाव  'इडियट्स ऑफ इस्तंबूल' असं आहे. ही एक प्रेमकथा असणार आहे.  चित्रपटाचा बहुतांश भाग केवळ भारतातच नाही तर तुर्की आणि युरोपमध्येही शूट केला जाईल. रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम आधीच सुरू झाले आहे. स्क्रिप्टला अंतिम रूप देण्यात येत आहे.  फहाद आणि तृप्ती यांची ऑन-स्क्रीन जोडी सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे. 

फहाद फासिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 'जोजी', 'आवेशम', 'कुंबलंगी नाईट्स' असे फहादचे अनेक सिनेमे गाजले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक फासिलच्या पोटी जन्मलेल्या फहाद फासिलने २००२ मध्ये आलेल्या कैयेथुम दोराथ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर फहादने ब्रेक घेतला आणि २००९ मध्ये 'केरळ कॅफे' या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत कमबॅक केलं. यानंतर 'चप्पा कुरिशु' या सिनेमात काम केले. हे चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉईंट ठरले, ज्यामुळे त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पहिला केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. फहाद आता साउथ सिनेमे गाजवून बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. 

टॅग्स :इम्तियाज अलीबॉलिवूडतृप्ती डिमरी