Join us

Prakash Raj : “त्याला भास्करही मिळणार नाही...”, ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रकाशराज यांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 18:16 IST

Prakash Raj : साऊथचे दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी बायकॉट बॉलिवूड गँगवर निशाणा साधला होता. आता त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाला लक्ष्य केलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ ( The Kashmir Files ) या सिनेमानं रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित हा सिनेमा रिलीज होऊन बराच काळ लोटला. पण अद्यापही या सिनेमाची चर्चा थांबलेली नाही. अलीकडे इस्रायली निर्माता नादव लॅपिड यांनी इफ्फी महोत्सवात ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा प्रोपगंडा व वल्गर असल्याचं म्हणत वाद निर्माण केला होता. यानंतर पटकथा लेखक व प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनीही ‘द काश्मीर फाइल्स’ला कचरा संबोधलं होतं. आता साऊथचे दिग्गज अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर तिखट शब्दांत टीका केली आहे.साऊथचे दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी काल बायकॉट बॉलिवूड गँगवर निशाणा साधला होता. आता त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाला लक्ष्य केलं.

  

काय म्हणाले प्रकाश राज?“काश्मीर फाइल्स हा एक बकवास सिनेमा आहे. हा सिनेमा कोणी प्रोड्यूस केला, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. माझ्या सिनेमाला ऑस्कर का मिळाला नाही, असं डायरेक्टर विचारतो आहे. त्याला ऑस्कर काय, पण भास्करही मिळणार नाही. एक इंटरनॅशनल ज्युरी या चित्रपटाबद्दल काय बोलला हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. कारण बाहेर संवेदनशील मीडिया आहे. इथे तुम्ही असे प्रोपोगंडा सिनेमे बनवू शकता. माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार, असे बकवास सिनेमे बनवण्यासाठी सुमारे २००० कोटी रूपये खर्च केले गेले होते, असं प्रकाश राज म्हणाले.

‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा गेल्यावर्षीच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 

टॅग्स :प्रकाश राजद काश्मीर फाइल्सविवेक रंजन अग्निहोत्रीबॉलिवूड