Join us

प्रतिक्षा संपली! प्रभासच्या 'सालार' ला नवीन रिलीज डेट मिळाली, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 12:15 IST

बहुप्रतिक्षित आगामी 'सालार' चित्रपटाला नवीन रिलीज डेट मिळाली आहे.

सुपरस्टार प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित आगामी 'सालार' चित्रपटाला नवीन रिलीज डेट मिळाली आहे.  आता 22 डिसेंबर 2023 रोजी प्रभास चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. याआधी हा चित्रपट २८ सप्टेंबरला रिलीज होणार होता पण पुढे ढकलण्यात आला होता. 

'सालार भाग 1 - सीझफायर' 22 डिसेंबर 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. होम्बले फिल्म्सने ट्विट करुन ही माहिती दिली. दरम्यान, तारीख निश्चित होण्यापुर्वी 'सालार'  22 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे कयास लावले जात होते. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.

'सालार' हा चित्रपट तामिळ, कन्नड व्यतिरिक्त हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने सांभाळली. याआधी प्रशांतने 'केजीएफ चॅप्टर 1' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे प्रभासच्या 'सालार'मध्ये  KGF चा रॉकी भाई म्हणजेच यशचा 5 मिनिटांची कॅमिओ पाहायला मिळेल. पण, निर्मात्यांनी अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.

'बाहुबली' आणि 'बाहुबली 2'च्या यशानंतर साऊथचा 'रेबल स्टार'  प्रभासची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. पण, 'बाहुबली'नंतर प्रभासचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. 'साहो, राधे श्याम' आणि 'आदिपुरुष' दमदार कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळे आगामी 'सालार' या चित्रपटाकडून अभिनेत्याला मोठ्या अपेक्षा आहेत. आता सालार चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धुमाकूळ घालतो, हे येणाऱ्या काळात कळेलच.

टॅग्स :प्रभासTollywoodसेलिब्रिटीसिनेमा