Join us

"कधीही भरून न निघणारं नुकसान" पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मनोज कुमार यांच्या पत्नी शशि यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:22 IST

नरेंद्र मोदींनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Pm Narendra Modi Writes To Manoj Kumar Wife: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं शुक्रवारी (४ एप्रिल) निधन झालं. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच तब्येत बरी नसल्याने मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. ५ एप्रिल रोजी त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले होते. सर्वांनी पुष्प अर्पण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. मात्र त्यांची पत्नी शशी गोस्वामी (Shashi Goswami) यांची अवस्था पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. मनोज यांचं शेवटचं दर्शन घेताना त्यांच्या पत्नी ढसाढसा रडताना दिसल्या. मनोज कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून मनोज यांच्या पत्नी शशि यांना धीर दिलाय.

नरेंद्र मोदींनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी पत्रात लिहलं, "श्रीमती शशि गोस्वामीजी, मनोज कुमार यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालं. या कठीण काळात माझ्या संवदेना कुटुंबीय आणि शुभचिंतकांसोबत आहे. दिग्गज अभिनेते आणि निर्माते मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून भारताच्या गौरवाला प्रभावशाली पद्धतीने दाखवलं. त्यांच्या अनेक चित्रपटांनी देशवासियांमध्ये देशभक्तीची भावना आणखी बळकट करण्यात मोलाचं योगदान दिलं".

"भारताच्या महत्त्वाकांक्षी युवाच्या रुपात त्यांच्या विविध भूमिकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला केवळ जिवंत केले नाही तर लोकांना देशाच्या चांगल्या भविष्यासाठी काम करण्याची प्रेरणाही दिली. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी कलात्मक पद्धतीने व्यक्त करून त्यांनी चित्रपटसृष्टीला सतत समृद्ध केलं. भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर आधारित त्यांच्या चित्रपटांमधील अनेक गाणी देशाप्रती असलेलं प्रेम आणि समर्पणाच्या भावनेला व्यक्त करतात. ही गाणी लोक सदैव गुणगुणत राहतील. मनोज कुमार यांच्यासोबत झालेल्या भेटी आणि विचारपूर्ण चर्चा मला सदैव लक्षात राहील. त्याचं कार्य आपल्या पिढ्यांना देश आणि समाजासाठी कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देईल. त्यांचं जाणं हे सिनेसृष्टीसाठी कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की कुटुंबाला आणि असंख्य शुभचिंतकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि संयम प्रदान करो. ओम शांती!", या शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :नरेंद्र मोदीमनोज कुमारसेलिब्रिटीबॉलिवूड