'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3) सिनेमाची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. या सिनेमातून परेश रावल (Paresh Rawal) बाहेर पडत असल्याची त्यांनी घोषणा केली होती. त्यांनी अचानक सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतल्याने अक्षय कुमारने त्यांच्यावर नुकसानभरपाईचा दावा केला होता. परेश रावल आणि सिनेमाच्या टीममध्ये काहीतरी बिनसल्याचं स्पष्ट दिसत होतं. परेश रावल सिनेमात दिसणार नाहीत म्हणून चाहतेही निराश झाले. मात्र काही दिवसात प्रकरण निवळलं आणि परेश रावल यांनी पुन्हा सिनेमात कमबॅक करत असल्याचं जाहीर केलं. आता त्यांनी सिनेमावर भाष्य केलं आहे.
न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले, "सिनेमाचं काम सुरु आहे. आम्ही पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये शूट सुरु करणार आहोत. काही महिन्यांपूर्वी जे झालं त्यामुळे माझं आणि दिग्दर्शक प्रियदर्शनचं नातं अजिबातच बिघडलेलं नाही. नातं असं खराब होत नाही. उलट आमचा बाँड आणखी स्ट्राँग झाला आहे. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. घाव भर गया है. आमचं नातं खूप पारदर्शक आहे."
परेश रावल यांच्या बाबूराव या भूमिकेवरही एक स्वतंत्र सिनेमा बनावा अशी चर्चा झाली. यावर ते म्हणाले, "याविषयी दिग्दर्शकासोबत माझं काहीच बोलणं झालेलं नाही. पण जर असा सिनेमा केलाच तरी श्याम म्हणून सुनील शेट्टीची आणि राजू म्हणून अक्षय कुमारची गरज लागेलच. मी काही लोभी अभिनेता नाही. मूर्खही नाही. जग माझ्या तालावर चालतं असं मला अजिबातच वाटत नाही. त्यामुळे उद्या जरी या भूमिकेवर स्वतंत्र सिनेमा आला तरी त्यात राजू आणि श्याम यांची गरज असेलच."