Join us

"कार्तिक सिनेमात असणार होता पण...", परेश रावल यांचा 'हेरा फेरी ३'बाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:03 IST

सिनेमांच्या सीक्वेल्सवर परेश रावल यांचं स्पष्ट मत, म्हणाले, "सीक्वेल कसा असावा? तर..."

हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात हिट कॉमेडी सिनेमांमध्ये 'हेरा फेरी'  (Hera Pheri) चं नाव येतंच. या सिनेमाचे अनेक चाहते आहेत. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांनी राजू, बाबूराव आणि श्याम या भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आजही सिनेमा टीव्हीवर लागला की पूर्ण पाहिला जातो. सिनेमा २००० साली आला होता. तर २००६ साली याचा सीक्वेल 'फिर हेरा फेरी' नावाने आला होता. आता सिनेमाचा तिसरा भागही येणार असून अक्षय-परेश-सुनील ही तिकडीच यामध्ये दिसणार आहे. दरम्यान नुकतंच परेश रावल (Paresh Rawal) यांनी तिसऱ्या भागात कार्तिक आर्यनला घेण्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

परेश रावल यांनी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी 'हेरा फेरी ३' बद्दलही अपडेट दिले. याची स्क्रीप्टही तितकीच मजेशीर आहे का? यावर ते म्हणाले, "मी अजून स्क्रीप्ट ऐकली नाही. पण नक्कीच असेल आणि असलीच पाहिजे. कारण लोकांना सिनेमाकडून खूप आशा आहेत. लोकांना सीक्वेल हवा आहे म्हणून मी तो साईन केला आहे. कदाचित काहीतरी चांगलं निघेल."

कार्तिक आर्यन 'हेरा फेरी ३' मध्ये असेल या चर्चांवर परेश रावल म्हणाले, "कार्तिक आर्यन सिनेमासाठी साईन झाला होता. तेव्हा सिनेमाची गोष्ट वेगळी होती. त्यात कार्तिकची भूमिका म्हणजे त्याला राजू समजून पकडून आणतात अशी होती. मी पूर्ण स्क्रीप्ट ऐकली नव्हती पण हे त्यात होतं. आता सिनेमात कार्तिक नाहीए कारण गोष्टच बदलली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपासून आम्ही शूटिंगला सुरुवात करणार आहोत."

एकामागोमाग एक सिनेमांचे सीक्वेल्स बनत आहेत. तुम्हाला हे पटतं का? यावर ते म्हणाले, "सीक्वेल कसा हवा? मुन्नाभाई एमबीबीएस नंतर जो लगे रहो मुन्नाभाई झाला हा खरा सीक्वेल. जरा असा बनवणार असाल तर सलाम आहे. पण जर फ्रँचायझीमधून फायदा घेण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी करत असाल तर त्यात मजा नाही. तुमच्याकडे जर बाबूराव सारखं कॅरेक्टर आहे ज्याची ५०० कोटींची गुडविल आहे तर त्याला कुठेतरी दुसऱ्या बॅकड्रॉपला टाका ना. प्रेक्षक नक्कीच बाबूरावला पाहायला तिथे येतील. पण जर तेच तेच केलं, नुसते जोक बदलले तर काही अर्थ नाही. प्रेक्षक तयार आहेत तर त्यांना चांगल्या दुसऱ्या प्रवासाला घेऊन जा. तेच तेच करत बसाल तर काय फायदा?"

टॅग्स :परेश रावलकार्तिक आर्यनअक्षय कुमारसुनील शेट्टीबॉलिवूड