Join us

"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 12:27 IST

परेश रावल यांनी हेरा फेरी ३ च्या कायद्याच्या भाषेत स्पष्ट शब्दांमध्ये रोखठोक उत्तर दिलं आहे. काय म्हणाले परेश रावल, जाणून घ्या

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सिनेमा अर्ध्यात सोडला आणि सर्वांना धक्का बसला. परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर अक्षय कुमारच्या कंपनीने त्यांच्या २५ कोटींचा दावा ठोकला. परेश रावल या संपूर्ण प्रकरणावर गप्प होते. परंतु आता परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला आणि प्रॉडक्शन हाउसला कायद्याच्या भाषेतच उत्तर दिलं आहे. परेश रावल यांनी X वर या प्रकरणाविषयी मोठी अपडेट शेअर केली आहे.

परेश रावल यांनी अक्षय कुमारने पाठवलेल्या नोटिसला दिलं उत्तर

परेश रावल यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर लिहिलं की, "माझे वकिल अमीत नाईक यांनी माझ्या त्या निर्णयाबाबत योग्य उत्तर पाठवले आहे. एकदा ते वाचल्यावर सर्व प्रश्न मिटतील."  अक्षय कुमारच्या 'केप ऑफ गुड फिल्म्स' या निर्मिती संस्थेने परेश रावल यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकला आहे. या दाव्याचे कारण म्हणजे, परेश रावल यांनी करारावर स्वाक्षरी करूनही 'हेरा फेरी ३' सिनेमातून बाहेर पडल्यामुळे निर्मात्यांना आर्थिक नुकसान झाले आहे. त्यावर परेश रावल यांनी कायदेशीर उत्तर पाठवलं आहे.

'हेरा फेरी ३'चं भविष्य अंधारात

या वादामुळे 'हेरा फेरी ३' सिनेमाचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रियदर्शन यांच्याकडे आहे. 'हेरा फेरी'च्या दोन्ही भागांमध्ये बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका परेश रावल यांनी अजरामर केली आहे. परेश रावल यांनी 'हेरा फेरी' सोडल्यावर सिनेमाची जादू कायम राहील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. परेश रावल यांच्या भूमिकेशिवाय 'हेरा फेरी' फिल्म सीरिजची ओळख अपूर्ण आहे. परेश यांनी हा सिनेमा सोडल्यावर त्यांच्या जागी कोण झळकणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :परेश रावलअक्षय कुमारसुनील शेट्टीबॉलिवूड