Join us

माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 09:52 IST

पाकिस्तानी कलाकारांचं इन्स्टा अकाऊंट भारतात दिसणार नाही, भारत सरकारची कारवाई

Pakistani actors instagram block in India: काश्मिरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वच हादरले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतानेपाकिस्तानवर एकानंतर एक कारवाई करायला सुरुवात केली. सिंधू पाणी करार रद्द केला, अटारी बॉर्डर बंद केली, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा निलंबित केले, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश दिले. तर आता भारताने पाकवर डिजिटल स्ट्राईकही केला आहे. आता पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत.

माहिरा खान, हानिया आमिर, फवाद खान, मावरा होकेन असे अनेक पाकिस्तानी कलाकार भारतातही प्रसिद्ध आहेत. मात्र सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती असताना भारताने हा मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेता फवाद खानचा 'अबीर गुलाल' हा हिंदी सिनेमा रिलीज होणार होता तो त्यावर आधी बंदी आली. सिनेमातील गाणीही युट्यूबवरुन काढून टाकण्यात आली. तर आता सर्व पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही भारतात दिसू शकणार नाहीत. अनेक भारतीय या पाकिस्तानी कलाकारांना फॉलो करत होते त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्समध्येही घट झाली असू शकते.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ या पाकिस्तानी कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं होतं. भारत सरकारने आतापर्यंत १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनलही ब्लॉक केले आहेत. यामध्ये जियो न्यूज, डॉन न्यूज, समा चीव्ही आणि एआरवाय न्यूजसह काही मी़डिया साईट्स, चॅनलचा समावेश आहे. 

टॅग्स :माहिरा खानइन्स्टाग्रामभारतपाकिस्तानपहलगाम दहशतवादी हल्ला