Join us

"आता मनासारखं जगावंस वाटतंय", नाना पाटेकरांनी केली निवृत्तीची घोषणा? म्हणाले-"एक जानेवारीला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 09:22 IST

नाना पाटेकरांनी केली रिटायरमेंटची घोषणा? म्हणाले- "आता नाटक, सिनेमातून ... "

Nana Patekar : मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर हे त्यांनी साकारलेल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे ओळखले जातात. 'क्रांतीवीर', 'परिंदा', 'अन्नीसाक्षी', 'तिरंगा' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठील लोकप्रिय ठरलेल्या 'नटसम्राट' या चित्रपटासह त्यातील डायलॉग आजही तितकेच लोकप्रिय आहेत. अशातच काल विवारी ‘नाम फाउंडेशन’चा दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त नाना पाटेकरांनी केलेल्या वक्यव्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. या सोहळ्यात नानांनी पुढच्या पिढीने काम सांभाळावं असं वक्तव्य करत निवृत्तीचे संकेत दिले आहेत. नाना पाटेकरांच्या या वक्तव्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यात नाना पाटेकर उपस्थितांसोबत संवाद साधला. त्यादरम्यान, बोलताना ते म्हणाले, " आजवर खूप काम केलं आहे. त्यामुळे आता मनासारखं जगावं असं वाटत आहे. एक जानेवारीला मी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीन. त्यानंतर नाटक, सिनेमातून निवृत्त होऊन गावखेड्यांतील विवंचना समजून घ्याव्यात, त्यांच्यासाठी काही करावं, असं वाटतं. नाम फाउंडेशनची धुराही आता मकरंदनेच पुढे न्यावी...’ अशी भावना नानांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. शिवाय कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच,’ असंही नाना यावेळी म्हणाले.

यापुढे नाना पाटेकरांनी म्हटलं की,"पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं,असं वाटतंय. म्हणजे ज्यातून तुम्हाला खूप काही सांगता येईल, अशी एखादी छान कलाकृती वाट्याला आली तर ती करेनही. पण आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या," असं नाना यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर नाम फाउंडेशनचा  पुढील कारभार आता मकरंद अनासपूरे सांभाळतील असंही त्यांनी जाहीर केलं. 

दरम्यान, नाना पाटेकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलिकडेच ते 'हाऊसफुल-५' या चित्रपटात पाहायला मिळाले. या शिवाय बहुचर्चित 'व्हॅक्सिन वॉर' मध्ये ही त्यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली. 

टॅग्स :नाना पाटेकरबॉलिवूडसेलिब्रिटी