Join us

'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:17 IST

त्या काळात सिनेमाचं शूट करताना आजच्यासारख्या सोयीसुविधा नव्हत्या.

८० ते ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारी अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री(Meenakshi Seashadri). श्रीदेवी, माधुरी या अभिनेत्रींनी टक्कर देणाऱ्या मिनाक्षी शेषाद्री आघाडीवर होत्या. त्या उत्तम डान्सरही आहेत. त्या काळात सिनेमाचं शूट करताना आजच्यासारख्या सोयीसुविधा नव्हत्या. याचंच उदाहरण नुकतंच मिनाक्षी यांनी एका मुलाखतीत दिलं आहे. डायरिया असतानाही त्यांनी पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

मिनाक्षी शेषाद्री एका मुलाखतीत म्हणाल्या, "त्या काळी खूप स्टुडिओ असे असायचे जिथे एकच रेस्टरुम होतं आणि सेटवर ५० ते १०० लोक काम करायचे. महिला-पुरुष दोघांसाठीही ते एकच वॉशरुम होतं. साफसफाई सुद्धा नीट व्हायची नाही. आम्ही फॅन्सी कॉस्च्युममध्ये असायचो त्यामुळे वॉशरुमला जाणं अवघड व्हायचं. एकदा तर मला डायरिया झाला असताना रोमँटिक गाणं शूट करायचं होतं. त्यात रेन डान्सचा सीक्वेन्सही होता. तो माझ्यासाठी सर्वात वाईट आणि भयानक अनुभव होता."

मिनाक्षी शेषाद्री यांनी अनेक बड्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. ऋषि कपूर, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा ते सनी देओल यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. सुपरहिट सिनेमे दिले आहेत. १९९३ साली आलेला त्यांचा 'दामिनी' तर ब्लॉकबस्टर होता. याशिवाय 'घायल', 'शहेनशाह', 'घातक' या सिनेमांमध्येही त्या दिसल्या. करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांनी १९९५ साली हरिश मैसूर यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांना केंद्रा ही मुलगी आणि जोश हा मुलगा आहे. अमेरिकेत त्यांचं स्वत:चं डान्स इन्स्टिस्ट्यूट आहे.

टॅग्स :मिनाक्षी शेषाद्रीबॉलिवूडनृत्यसिनेमा