मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेता म्हणजे किशोर नांदलस्कर. मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा हा अभिनेता आज आपल्यात नाही. मात्र, त्यांच्या अभिनयातून ते आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक जुना किस्सा चर्चेत आला आहे. एकेकाळी जागे अभावी हा अभिनेता चक्क देवळामध्ये झोपायचा. मात्र, याविषयी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना कळताच त्यांनी तातडीने किशोर नांदलस्कर यांना राहण्यासाठी घर मिळवून दिलं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण शेजारी असलेल्या शेजवली या गावात किशोर नांदलस्कर यांचा जन्म झाला. मात्र, त्यांचे वडील उत्तम कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये स्त्री पात्राची भूमिका साकारली होती. तसंच ते मुंबईतील ज्युपिटर गिरणीत काम करत असताना कामगार नाट्यस्पर्धेतून नाटकही बसवायचे. त्यामुळे किशोर यांच्या मनावर लहानपणापासूनच अभिनयाचे संस्कार झाले होते. दूरदर्शनवरील 'गजरा' या कार्यक्रमातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मराठीसह बॉलिवूडमध्येही नशीब आजमावलं. मात्र, कलाविश्वात एवढं नाव कमावूनही त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. घर लहान असल्यामुळे ते दररोज रात्री एका मंदिरात झोपायचे. विशेष म्हणजे त्यांच्या या परिस्थितीची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कानी लागली आणि तात्काळ त्यांनी मदतीचा हात पुढे केला.
अशी केली विलासरावांनी मदत
किशोर नांदलस्कर मुंबईतील भोईवाडा-परळ या भागात राहत होते. मात्र, त्यांचं घर अत्यंत लहान होतं. त्यामुळे जागेअभावी ते दररोज एका मंदिरात झोपायचे. ही गोष्ट विलासराव देशमुखांना कळल्यानंतर त्यांनी लगेचच किशोर नांदलस्कर यांना बोरीवलीमध्ये घर मंजूर करुन दिलं. त्यामुळे किशोर यांना बोरीवलीमध्ये त्यांच्या हक्काचं घर मिळालं.
दरम्यान, किशोर नांदलस्कर यांनी मराठीतील अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात हुंटाश, मिस यु मिस, माझ्या नवऱ्याची बायको यांसारख्या मालिका, सिनेमांचा समावेश आहे. तर, वास्तव, जिस देश में गंगा रहता है, खाकी, तेरा मेरा साथ रहे, हलचल, ये तेरा घर ये मेरा घर या बॉलिवूड सिनेमांमध्येही ते झळकले होते.