Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी हिंदू, बायको मुस्लिम अन् मुलगी...", मनोज वाजपेयींचा खुलासा; धर्माच्या प्रश्नावर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:22 IST

वडिलांच्या अंत्यसंस्काराला हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिम होते; मनोज वाजपेयींचा खुलासा, 'माझा धर्म कोणता?' लेकीने विचारलेला प्रश्न

मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee) भारतीय सिनेसृष्टीतील प्रभावशाली अभिनेते आहेत. त्यांनी 'सत्या','गँग्स ऑफ वासेपूर','राजनीति' असे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. वैयक्तिक आयुष्यात ते अभिनेत्री शबाना रजाच्या प्रेमात पडले आणि २००६ साली त्यांनी लग्नही केलं. मनोज वाजपेयीहिंदू तर शबाना मुस्लिम कुटुंबातून येते. त्यांना एक मुलगीही आहे. घरात धर्मावरुन काय चर्चा होते यासंदर्भात मनोज वाजपेयींनी नुकताच खुलासा केला.

बरखा दत्त ला दिलेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाले, "मी आणि शबाना एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. धर्मावरुन आमच्या घरात कधीच कोणती अडचण आली नाही. आमचं लग्नही खूप सहज झालं कोणाकडूनच विरोध झाला नाही याचं मलाही तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. माझे वडील खूप चांगले व्यक्ती होते. त्यांचे अनेक मुस्लिम मित्र होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराला हिंदूंपेक्षा मुस्लिमच जास्त होते. त्यामुळे तुम्ही समजू शकता की मी कशा वातावरणात वाढलो आहे. "

ते पुढे म्हणाले, "घरात धर्माबाबतीत चर्चा करण्याची काही गरज वाटत नाही. आमच्यात भांडणंही होत नाही. आमच्या प्रत्येकाची एक स्पेस आहे. एकदा माझ्या मुलीने सांगितलं की तिच्या मित्रमैत्रिणींच्या घरात धर्मावरुन चर्चा होते. तिने एकदा शबाना विचारलं की 'आई, माझा धर्म कोणता?' यावर शबाना तिला म्हणाली,'ते तूच ठरव'. आम्ही दोघंही आपापल्या धर्माचे रितीरिवाज पाळतो. माझी मुलगी कधी प्रणाम करते तर कधी नाही. आम्ही यावरुन तिला कधीच प्रश्न विचारत नाही."

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉलिवूडपरिवारहिंदूमुस्लीम