बॉक्सऑफिसवर सध्या बॉलिवूड नाही तर साऊथच्या सिनेमांचीच चलती आहे. 'पुष्पा 2' ची क्रेझ असतानाच आणखी एका साऊथ सिनेमाने सर्वांना भुरळ घातली आहे. त्यामुळे वरुण धवनचा 'बेबी जॉन'ही मागे पडला आहे. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या मुहुर्तावर रिलीज होऊनही 'बेबी जॉन' (Baby John) फारशी कमाल दाखवू शकत नाहीए. सिनेमाची कमाईत घट होत आहे. तर दुसरीकडे मल्याळम सिनेमा 'मारको' (Marco)ने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
'जवान' फेम ॲटली निर्मित वरुण धवनचा 'बेबी जॉन' सिनेमा २० डिसेंबर रोजी रिलीज झाला. सिनेमात भाईजान सलमान खानचाही कॅमिओ आहे. 'बेबी जॉन'च्या टक्कर मध्ये 'पुष्पा २' ही होताच. 'बेबी जॉन'ला चार दिवसात २५ कोटींचाही आकडा पार करता आलेला नाही. पहिल्या दिवशी सिनेमाने ११.२५ कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी केवळ चार कोटींचीच कमाई केली. तिसऱ्या दिवशी तर ६५ लाखांची कमाई करत बेबी जॉनची वाईट स्थिती झाली. वीकेंडही सिनेमाला वाचवू शकला नाही. काल शनिवारी सिनेमाने केवळ ७५ लाख कमावले. त्यामुळे आतापर्यंत सिनेमाची एकूण कमाई फर्त २३.९ कोटी झाली आहे.
बेबी जॉन थिएटरमधून हटवणार?
प्रेक्षक 'बेबी जॉन'च्या जागी मल्याळम सिनेमा 'मारको'ला पसंती देत आहे.सिनेमात खूप जास्त व्हॉयलंस आहे तरी लोक थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघत आहेत. हा सिनेमा संदीप वांगा रेड्डीच्या 'ॲनिमल' पेक्षाही चांगला असल्याची प्रतिक्रिया येत आहे. यामुळे आता थिएटरमध्ये 'बेबी जॉन' हटवून 'मारको'चे शो वाढवण्यात येणार आहेत. मारकोच्या हिंदी व्हर्जनचे १४० शोज वाढवण्यात आले आहेत. 'मारको'ने आतापर्यंत २० कोटींचा गल्ला जमवला आहे. 'मारको'सिनेमा अभिनेता उन्नी मुकुंदन मुख्य भूमिकेत आहे. हनीफ अदेनी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.