सध्या बॉक्स ऑफिसवर एका सिनेमाची चांगलीच हवा आहे. हा सिनेमा म्हणजे 'महावतार नरसिंह'. हा सिनेमा अॅनिमेटेड जरी असला तरीही लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण हा सिनेमा पाहायला गर्दी करत आहेत. भगवान विष्णुच्या नरसिंह अवतारावर हा सिनेमा आधारीत आहे. 'महावतार नरसिंह' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या बिग बजेट सिनेमांना मागे सोडलं आहे. अजय देवगण, तृप्ती डिमरी यांसारख्या बड्या कलाकारांचे सिनेमे 'महावतार नरसिंह'समोर झुकले आहेत. जाणून घ्या
'महावतार नरसिंह' बॉक्स ऑफिसवर गर्जना
अश्विन कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला अॅनिमेशन सिनेमा 'महावतार नरसिंह'ची सुरुवात खूप संथ झाली होती. पहिल्या दिवशी या सिनेमाने केवळ १.७५ कोटींची कमाई केली होती. परंतु माउथ पब्लिसिटीच्या जोरावर या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. नुकताच जो वीकेंड झाला त्यामध्ये शनिवार-रविवारची कमाई मिळून या सिनेमाने ३८ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळेच 'महावतार नरसिंह'चं एकूण कलेक्शन १० दिवसांमध्ये तब्बल ९१ कोटी इतकं झालं आहे. अशाप्रकारे 'महावतार नरसिंह' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलंच अधिराज्य गाजवलं आहे.
बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांच्या कमाईवर 'महावतार नरसिंह'मुळे परिणाम झाला आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या 'धडक २' सिनेमाच्या कमाईवर यामुळे परिणाम झाला आहे. या सिनेमाने तीन दिवसांमध्ये फक्त ११ कोटींची कमाई केली आहे. याशिवाय 'सन ऑफ सरदार २'ने ३ दिवसात २४ कोटींची कमाई केली आहे. एकूणच 'महावतार नरसिंह' सिनेमामुळे बिग बजेट बॉलिवूड सिनेमांच्या कमाईवर मोठा परिणाम झालाय. 'महावतार नरसिंह' येत्या काही दिवसात १०० कोटी क्लबमध्ये दाखल होणार, अशी शक्यता आहे.