काल सगळीकडेच ईद उत्साहात साजरी झाली. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही ईद जल्लोषात साजरी केली. सलमान खानने त्याच्या घरी पार्टी ठेवली होती. बुलेटप्रूफ गॅलरीमध्ये येत त्याने सर्व चाहत्यांना अभिवादन करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. अनेक चाहते त्याच्या घराबाहेर जमले होते. तिकडे शाहरुख खाननेही मन्नतच्या टेरेसवर येत त्याच्या स्टाईलमध्ये सर्वांना शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडचा तिसरा खान आमिरनेही (Aamir Khan) ईद उत्साहात साजरी केली. यावेळी त्याच्या दोन्ही पूर्व पत्नींचा सेल्फी आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रीना दत्ता (Reena Dutta) आणि किरण राव (Kiran Rao) दोघीही आमिरच्या पूर्वी पत्नी आहे. रीना दत्तासोबत आमिरचा १६ वर्ष संसार होता. नंतर त्यांचा काडीमोड झाला. तर किरण रावसोबतही त्याचा १६ वर्षांचा संसार मोडला. आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. आयरा खानच्या लग्नात त्यांचा बाँड बघायला मिळाला होता. तर आता काल ईदलाही दोघी एकत्र आल्या. किरण रावने ईद सेलिब्रिशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये आमिरच्या बहिणीही आहेत. तसंच जावई नुपूर आणि त्याची आईही एका फोटोत आहे. शेवटच्या फोटोत किरण रावने रीना दत्तासोबतचा गोड फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघीही छान हसताना दिसत आहेत.
"अम्मीकडची ईद- सर्वोत्कृष्ट आणि सुंदर होस्टेस... मित्रपरिवारासोबत सण साजरा करता येणं हे नेहमीच आनंद देणारं असतं. हे वर्ष शांततापूर्ण असावं आणि सर्वांना आनंद देणारं असावं हीच प्रार्थना." असं कॅप्शन तिने दिलं आहे.
आमिर खान सध्या गौरी स्प्रॅटला डेट करतोय. या फोटोंमध्ये आमिर आणि त्याच्या गर्लफ्रेंडची झलक मात्र दिसली नाही. आमिर आणि रीना दत्ताचा २००२ साली घटस्फोट झाला होता. तर २०२१ साली किरण रावसोबत काडीमोड झाला. आता तो गौरी स्प्रॅटसोबत खूश आहे.