केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूने संपूर्ण देश हळहळला आहे, हादरला आहे. अननसातून फटाके खायला देऊन केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. तसेच बॉलिवूडच्या कलाकारांनीदेखील या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. कलाकारांनी ट्विट करत या अमानुषपणे केलेल्या हत्तीणीच्या हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अक्षय कुमारने ट्विट केले की, प्राणी माणसांपेक्षा कमी जंगली असू शकतात. या हत्तीणीसोबत जे झाले ते खूप मन हेलावून टाकणारे होते. माणूसकीला काळीमा फासणारे आणि अस्वीकार्य आहे. दोषींविरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे.
श्रद्धा कपूरने पेटा इंडिया आणि सीएमओ केरळला टॅग करत ट्विट केले की, कसे ? अखेर असे कसे होऊ शकते  ? लोक निदर्यी कसे असू शकतात  ? या घटनेमुळे मी कोलमडून गेले आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.
 तर जॉन अब्राहमने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आणि काही संस्था व नेत्यांना टॅग केले. लिहिले की, ही घटना लज्जास्पद व घृणास्पद आहे. मला माणूस असल्याची लाज वाटते आहे.
 अथिया शेट्टीने पेटा इंडियाला टॅग करत लिहिले की, ही खूप भयानक आणि असभ्य वर्तणूक आहे. अखेर असे कसे करू शकतात ? मी आशा करते, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, दोषींच्या विरोधात कारवाई केली पाहिजे.
 रणदीप हुडाने ट्विट केले की, एक गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घालणं हे सर्वात अमानवीय काम आहे. हे अजिबात पटत नाही. दोषींविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. रणदीपने ट्विट करताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन व भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना टॅग केले.
 काही सेलिब्रेटींनी प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याकरीता ऑनलाइन याचिका साइन करण्याचे आवाहन केले आहे.
कॉमेडियन कपिल शर्मा व अभिनेत्री दिया मिर्झाने याविरोधात आवाज उठविण्यास सुरूवात केली. या याचिकेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.