Join us

नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:20 IST

करण जोहरने इन्स्टाग्रामवर 'सैय्यारा' सिनेमासाठी लांबलचक पोस्ट शेअर केली आहे . याच पोस्टवर एकाने त्याला अशी कमेंट केली आहे.

बॉलिवूडमध्ये दोन नवीन स्टार्स जन्माला आले आहेत. अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनीत पड्डाच्या (Aneet Padda) 'सैय्यारा' सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. 'आशिकी' व्हाईब्स देणारा हा सिनेमा तरुणाईमध्ये  लोकप्रिय ठरत आहे. अनेकजण थिएटरमध्ये अक्षरश: रडत आहेत तर कुठे अख्खं थिएटर सैय्यारा गाणं गात आहे. 'सैय्यारा'ची ही लोकप्रियता पाहून करण जोहरनेही(Karan Johar) प्रतिक्रिया देत अहान पांडे आणि अनीत पड्डाचं कौतुक केलं आहे. मात्र यावर करण ट्रोल झाला आहे. तर करणने ट्रोलरला सडेतोड उत्तरही दिलं आहे. 

करण जोहरने इन्स्टाग्रामवर 'सैय्यारा' सिनेमासाठी लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. तो लिहितो, "मला आठवत नाही मी शेवटचा कोणता सिनेमा पाहून इतका भावुक झालो. अश्रू येतच आहेत पण आनंदही आहे. सिल्व्हर स्क्रीनवर एक प्रेमकथा इतकी गाजत आहे याचा आनंद आहे. या सिनेमाने संपूर्ण देशाला प्रेमात पाडलं आहे. यशराज फिल्म्सने लव्हस्टोरीचा काळ पुन्हा आणला आहे. मोहित सुरीने त्याच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ट सिनेमा बनवला आहे. त्याच्या स्टोरीटेलिंग, क्राफ्ट आणि संगीताच्या जादुई वापरामुळे मी चकित झालो आहे. संगीत या सिनेमाचा फक्त गाभा नाही तर मेन कॅरेक्टर आहे. अहान पांडे...काय पदार्पण केलं आहेस. तू माझं हृदय तोडलंस पण फिल्ममेकर म्हणून माझ्यात नवी ऊर्जा संचारली. तुझे डोळे खूप बोलतात आणि तुझा पुढील प्रवास पाहण्यासाठी मी आणखी वाट बघू शकत नाही. तू कमाल आहेस. मूव्हीज मध्ये तुझं स्वागत. 

तो पुढे लिहितो, "अनीत पड्डा, सुंदर मुली...किती प्रेमळ आणि कमाल आहेस. तुझी शांतता सर्व काही सांगते आणि तुझी क्षमता पाहून माझ्या डोळ्यात पाहणी आलं आहे. अहान आणि तू तुम्ही दोघंही मॅजिकल आहात. सैय्याराच्या टेक्निकल आणि म्युझिक टीमचेही अभिनंदन. हुशार एडिटिंग टीमचेही विशेष अभिनंदन. "

करणच्या या पोस्टवर एकाने कमेंट करत लिहिले, 'आ गया नेपोकिड का दाईजान'. ट्रोलरच्या या कमेंटवर करणनेही रिप्लाय दिला आहे. तो लिहितो, 'चुप कर! घरी बसल्या बसल्या नकारात्मकता पसरवू नको. दोन मुलांनी केलेलं काम पाहा आणि स्वत:ही थोडं काम कर.'

टॅग्स :करण जोहरट्रोलबॉलिवूड