Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पदुकोणच्या 8 तास कामाच्या मागणीवर कंगना राणौतची प्रतिक्रिया; म्हणाली, "यात काहीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:43 IST

कंगनाने दीपिकाची घेतली बाजू?

गेल्या वर्षी दीपिका पदुकोणने दिवसाला केवळ ८ तास काम करण्याची मागणी केल्यानंतर सिनेसृष्टीत मोठ्या वादाला तोंड फुटले होते. आता या वादात बॉलिवूडची 'क्वीन' आणि खासदार कंगना रणौतने उडी घेतली असून तिने दीपिकाच्या मागणीचे समर्थन केले आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना कंगनाने स्पष्ट केले की, दीपिकाने चित्रपटसृष्टीत तिचे एक स्थान निर्माण केले आहे आणि सर्वोच्च अभिनेत्री तसेच एक आई म्हणून तिला अशा प्रकारची मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' आणि 'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वलमधून दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आई झाल्यामुळे तिने कामाचे तास मर्यादित ठेवण्याची अट घातली होती, जी निर्मात्यांना अमान्य होती. यावर भाष्य करताना कंगना म्हणाली, "या विषयाचा उगाच वाद करू नये. दीपिकाने आज जे स्थान मिळवले आहे, ते तिने कमावले आहे. ती आता एका मुलीची आई आहे. जर आज तिला ८ तास काम करावेसे वाटत असेल, तर तिची ही मागणी पूर्णपणे रास्त आहे."

कंगनाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला त्या दोघीही १२ ते १४ तास काम करायच्या. कंगना म्हणाली, "जेव्हा आम्ही तरुण होतो, तेव्हा यशासाठी आम्ही खूप धडपडत होतो. तेव्हा आम्ही १२-१४ तास शिफ्ट करायचो कारण आम्हाला यशस्वी व्हायचे होते. पण काळानुसार गोष्टी बदलतात. जेव्हा तुम्ही नवीन असता, तेव्हा तुमची जागा कोणीही घेऊ शकतं, पण दीपिका आज ज्या टप्प्यावर आहे, तिथून तिला तिच्या कुटुंबाकडे आणि बाळाकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे."

दीपिका सध्या तिच्या आगामी मोठ्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे. ती दिग्दर्शक ॲटली यांच्या 'राका' या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे, तसेच शाहरुख खानच्या 'किंग'मध्येही तिची महत्त्वाची भूमिका आहे. दुसरीकडे, कंगना रणौत नुकतीच 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसली होती आणि आता ती 'ब्लेस्ड बी द एव्हिल' या हॉरर-ड्राम्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सिनेसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेत्रींनी 'वर्क-लाईफ बॅलन्स'वर घेतलेली ही भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kangana Ranaut supports Deepika Padukone's 8-hour workday demand.

Web Summary : Kangana Ranaut backs Deepika Padukone's request for an 8-hour workday, citing Deepika's established position and motherhood. She recalled their earlier 12-14 hour shifts, emphasizing Deepika's right to prioritize family now. Deepika is busy with 'Raaka' and 'King', while Kangana prepares for her international debut.
टॅग्स :कंगना राणौतदीपिका पादुकोणबॉलिवूड