आपल्या दिलखुलास स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री काजोल (Kajol) अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. शाहरुख खानसोबत तिची जोडी खूप गाजली. तिने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सिनेमे केले आहेत. अभिनेत्रीच नाही तर तिने खलनायिकेचंही काम उत्तमरित्या साकारलं. दरम्यान काजोलला नेहमी तिच्या स्किन टोनवरुन जज केलं गेलं.'बाजीगर' सिनेमात तिचा डार्क स्किन टोन होता. मग नंतर काजोल अचानक गोरी कशी दिसायला लागली असा अनेकांना प्रश्न पडायचा. काजोलने स्किन व्हाइटनिंग ट्रीटमेंट घेतली का अशीही चर्चा झाली. एका मुलाखतीत काजोलने या चर्चांवर भाष्य केलं होतं.
'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणालेली की, "मला सुरुवातीला स्किन टोनवरुन बरेच टॅग्स दिले गेले. काळी, जाड दिसते आणि प्रत्येक वेळी चष्मा घालून असते असं म्हटलं गेलं. जेव्हा मी इंडस्ट्रीत काम सुरु केलं तेव्हा माझ्याबाबतीत अनेक जजमेंटही पास केले गेले. पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मी स्मार्ट आहे, कूल आहे हे मला माहित होतं. जे नकारात्मक बोलतात त्यांच्यापेक्षा तर मी नक्कीच चांगली आहे याची मला कल्पना होती."
अचानक गोरी दिसण्याबद्दल काजोल म्हणाली होती की, "मी कोणतीही स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही. करिअरचे १० वर्ष मी सतत उन्हात काम केलं. यामुळे माझी त्वचा खूप काळवंडली होती. आता माझं उन्हात तितकं काम नसतं. मी जास्त उन्हात शूटही केलं नाही. त्यामुळे आता त्वचा पूर्वपदावर आली. ही काही स्किन व्हाइटनिंग सर्जरी नाही तर ही स्टे अॅट होम सर्जरी आहे."