Join us

Jolly LLB 3 Trailer: अक्षय कुमार-अर्शद वारसी आमनेसामने, शेतकऱ्यांची भावुक कहाणी सांगणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:20 IST

अक्षय कुमार अर्शद वारसींची प्रमुख भूमिका असलेला 'जॉली एलएलबी ३' हा सिनेमा हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा आहे, यात शंका नाही

काही दिवसांपूर्वी 'जॉली एलएलबी ३'ची घोषणा झाली. या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे कारण जॉली एलएलबी पार्ट १ आणि २ मधील कलाकार अर्शद वारसी आणि अक्षय कुमार एकमेकांना भिडणार आहेत. सिनेमाची उत्सुकता शिगेल असतानाच 'जॉली एलएलबी ३'चा बहुचर्चित ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर खळखळून हसवणारा आहेच शिवाय शेतकऱ्यांची भावुक कहाणी सांगणाराही आहे. जाणून घ्या काय आहे 'जॉली एलएलबी ३'च्या ट्रेलरमध्ये

'जॉली एलएलबी ३'चा ट्रेलर

'जॉली एलएलबी ३'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, एक शेतकरी बाप मुलाच्या फोटोफ्रेमसमोर रडत असतो. अशातच एक म्हातारी आजी एका पुतळ्याला मिठी मारुन रडताना दिसते. पुढे ट्रेलरमध्ये दिसतं की, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी अर्थात दोन्ही जॉली आपापल्या संसारात आणि कामात व्यस्त असतात. परंतु दोघांचं नाव एकच असल्याने लोकांचा गोंधळ होतो. त्यामुळे दोघं एकमेकांशी भांडताना दिसतात. पुढे कोर्टात न्यायाधीश म्हणून पुन्हा एकदा सौरभ शुक्ला यांची एन्ट्री होते. दोन्ही जॉली एकमेकांशी भांडत असल्याने त्यांना शांत करण्यात न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या नाकीनऊ येतात.

पुढे शेतकऱ्यांचा जमिनी हडपणारा खलनायक म्हणून मंत्र्याच्या भूमिकेत गजराज रावची एन्ट्री होते. गजराज राव दिवसाला ५० हजार रुपये देईल, असं आमिष दाखवत अक्षय कुमारला त्याचा वकील म्हणून नेमतो. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने कोर्टात लढण्यासाठी अर्शद वारसी उभा राहतो. पुढे अक्षय आणि अर्शद एकमेकांसमोर येतात. आता या खटल्यात कोण बाजी मारणार? शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळणार का? या प्रश्नांची उत्तरं 'जॉली एलएलबी ३' सिनेमा रिलीज झाल्यावरच कळतील. हा सिनेमा पुढील शुक्रवारी अर्थात १९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.  या सिनेमात अक्षय कुमार, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, अमृता राव, सौरभ शुक्ला, गजराज राव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

टॅग्स :अक्षय कुमारअर्शद वारसीबॉलिवूडअमृता रावहुमा कुरेशी