पहलगाम हल्ल्यानंतर (pahalgam attack) भारताने पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा (fawad khan) सिनेमा 'अबीर गुलाल' सिनेमाच्या प्रदर्शनाला भारताने बंदी आणली. पाकिस्तानी सिनेमे आणि कलाकारांवर बंदी आणणं योग्य आहे का, या मुद्द्यावर गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यांनी मौन सोडलंय. पीटीआयच्या एका व्हिडिओत जावेद म्हणाले की, "सर्वप्रथम असा प्रश्न विचारायला हवा की, पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्याची परवानगी खरंच द्यावी का? या प्रश्नाचे दोन उत्तरं आहेत. ही दोन्ही उत्तरं तितकीच तार्किक आहेत."
"ही बाजू नेहमीच एकतर्फी राहिली आहे. नुसरत फतेह अली खान, गुलाम अली, नूरजहाँ भारतात आले आणि आपण त्यांचं मोठ्या आदरपूर्वक स्वागत केलं. फैज अहमद फैज हे महान कवी आहेत, जे पाकिस्तानात राहत होते. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात भारतात आले होते, त्यांना राष्ट्राध्यक्षासारखा सन्मान देण्यात आला. पण मला वाटतं की आपल्याला कधीच अशी वागणूक मिळाली नाही. माझा पाकिस्तानच्या लोकांबद्दल काहीही राग नाही."
"लता मंगेशकर यांनी पाकिस्तानमध्ये कधीही कार्यक्रम का केला नाही? त्यांच्या गाण्यांसाठी पाकिस्तानातील अनेक मोठ्या कवींनी लिहिलं आहे. ६० आणि ७० च्या दशकात त्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही ठिकाणी खूप लोकप्रिय होत्या. तरीही पाकिस्तानात लतादीदींचा एकही कार्यक्रम का झाला नाही?"
जावेद अख्तर पुढे म्हणाले, "मी पाकिस्तानच्या लोकांना दोष देणार नाही, कारण त्यांचं प्रेम खरं होतं. पण त्यांना अडथळे होते, आणि ते अडथळे तिकडच्या व्यवस्थेमधून होते. जे मला आजही समजत नाहीत. ही एकतर्फी देवाणघेणाव आहे. याची दुसरी बाजू सांगायची तर, जर आपण पाकिस्तानी कलाकारांना रोखत असू, तर आपण पाकिस्तानात कोणाला खूश करत आहोत? तिकडचे राजकीय पक्ष आणि कट्टरपंथीयांना! कारण त्यांनाच ही दुरी हवी आहे, त्यांना हे योग्य वाटतं. अशाप्रकारे या प्रश्नाच्या दोन बाजू सांगता येतील. पण सध्याच्या काळात विशेषतः पहलगाममध्ये जे घडलं त्या पार्श्वभूमीवर, असे प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही." अशाप्रकारे जावेद अख्तर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.