सनी देओलच्या (Sunny Deol) 'जाट' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अभिनेता सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच सनी देओल रजस्थानमधील जैसलमेरला पोहोचला. त्यानं भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या तनोट माता मंदिराला भेट दिली आणि चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. यावेळी सनी देओलनं जवानांसोबत खास वेळ घालवला.
सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या 'गदर एक प्रेम कथा' चित्रपटातील एका गाण्यावर जवानांसोबत नाचताना दिसत आहे. सनीसोबतच सैनिकांनी फोटोही काढले. सनी देओलने जवानांशी संवाद साधला आणि त्यांचं कौतुकही केले. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या समर्पणाचा देशाला अभिमान आहे, असे सनी देओल म्हणाले. सैनिकांनीही सिनेमाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
सनी देओलच्या 'जाट' चित्रपट आज १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केले आहे. हा एक अॅक्शन चित्रपट आहे. सनी देओलशिवाय, रेजिना कॅसांड्रा, रणदीप हुडा, उर्वशी रौतेला, विनीत सिंह कुमार, सैयामी खेर, रम्या कृष्णा आणि जगपती बाबू यांसारखे कलाकारही यात दिसले आहेत.