Join us  

भारतीय मेकअप आर्टिस्ट जगात सर्वोत्तम : विक्रम गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 2:15 PM

भारतात प्रत्येक प्रांतानुसार माणसाच्या त्वचेचा रंग, पोत, नाकाची ठेवण, केस सगळेच बदलते.

ठळक मुद्दे ‘मेकअप डिझायनर-क्रिएटिंग अ‍ॅन इल्युजन’ विषयावर व्याख्यान

पुणे : परदेशात त्वचेचा रंग एक तर गोरा किंवा काळा असतो. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या त्वचेवर कशा पद्धतीचा मेकअप करावा याचे पुरेसे ज्ञान नसते. याउलट भारतात प्रत्येक प्रांतानुसार माणसाच्या त्वचेचा रंग, पोत, नाकाची ठेवण, केस सगळेच बदलते. या वैविध्यात भारतीय मेकअप डिझायनर घडतात. त्यामुळे फार आधुनिक प्रकारचा मेकअप न वापरताही मला ते श्रेष्ठ वाटतात, असे मत प्रसिद्ध मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांनी व्यक्त केले.‘पिफ’मध्ये गायकवाड यांचे ‘मेकअप डिझायनर- क्रिएटिंग अ‍ॅन इल्युजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.गायकवाड यांनी बालरंगभूमीपासून या क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचे पहिले गुरू बबनराव शिंदे यांचे नाटकाच्या ड्रेपरीचे दुकान होते. तेथूनच पात्राला आवश्यक कपडे, मेकअप या सगळ्याविषयी उत्सुकता वाढायला सुरुवात झाल्याचे गायकवाड म्हणाले. त्यांची चित्रपटांमधील मेकअप करिअरची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील ‘सरदार’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर ‘मेकिंग आॅफ महात्मा’, ‘बालगंधर्व’, अलीकडचा ‘संजू’,  कपिल देव यांच्यावरील आगामी चित्रपट ‘८३’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी मेकअप डिझायनर म्हणून काम केले असून हिंदी, मराठी व बंगाली चित्रपटांसाठी त्यांना ५ वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.त्यांच्या या प्रवासातील किस्से सांगताना गायकवाड म्हणाले, की ज्या काळात मी सुरुवात केली तेव्हा तंत्रज्ञान फार पुढे गेलेले नव्हते व परदेशी साधनसामग्रीही सहज उपलब्ध होत नसे. त्यामुळे उपलब्ध साधनांमधूनच मार्ग शोधून काम करत असे. नाकासारख्या अवयवाला आकार देण्यासाठी मऊ केलेले मेण वापरणे, झाडांपासून मिळणारा चिक म्हणजे ‘लेटेक्स’ मागवून त्यापासून मास्क बनवणे, इत्यादी माध्यमातून मी काम करत राहिलो. आपण बºयाचदा खूप मेहनत घेतो़ मात्र समोरच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आपण निराश होतो; पण त्यावेळी खचून न जाता टिकून राहिलो तरच आपण पुढे जाऊ शकतो. चित्रपट सृृष्टीत तोंडी प्रसिद्धीने अधिक कामे मिळतात. त्यामुळे मला व्यक्तिधिष्ठित पात्रांसाठी कामे मिळत गेली........मेकअप डिझायनरला त्याच्या कामात पूर्ण मोकळीक दिली तर तो चमत्कार घडवू शकतो. मात्र जेव्हा कलाकार त्यांची प्रतिमा, दिसणे याला चिकटून असतात तेव्हा काम करणे आव्हानात्मक असते. तरीही हे चित्र बदलले असून, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांच्यासारखे कलाकार मेकअप डिझायनरला समर्पित होऊन मेकअप करून घेताना दिसतात. -विक्रम गायकवाड

टॅग्स :पुणेपीफबॉलिवूडसिनेमा