सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर त्याच दिवशी निकाल लागणार आहे. अभिनेता गोविंदा महायुतीचा स्टार प्रचारक आहे. नुकतेच गोविंदा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगावातील रोड शोमध्ये सहभागी झाला होता. मात्र यादरम्यान ऐन सभेत त्यांच्या छातीत दुखू लागले, यानंतर तो तातडीने मुंबई रवाना झाला.
जवळगावमधून मुंबईसाठी रवाना होता गोविंदाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, ठसध्या माझ्या छातीत दुखत आहे. माझी तब्येत बरी नाही. मला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे मला हा रोड शो मध्येच सोडावा लागतोय. यासाठी मी लोकांची माफी मागतो. आधीच पायात गोळी लागली होती. आता छातीत थोडं दुखतंय".
गोविंदाच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, "अभिनेता आता ठीक आहे. तो थकला होता. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटत होतं". गोविंदा हा काँग्रेसचा माजी लोकसभा खासदार होता. यानंतर त्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सध्या तो संपुर्ण महाराष्ट्र शिंदे सेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार घेत होता. दरम्यान काही दिवसांपुर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. डॉक्टरांनी त्याला काही दिवस घरीच व्यायाम आणि फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला होता. 1 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या रिव्हॉल्वरने गोळी झाडल्यानंतर त्यांना मुंबईतील क्रिटी केअर एशिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.