बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'डॉन ३' वादामुळेच जास्त चर्चेत आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यात या प्रोजेक्टवरून मोठे मतभेद झाल्याचे समोर आले. शाहरुखनंतर आता रणवीर सिंह 'डॉन' बनणार अशी अधिकृत घोषणा झाली होती. मात्र रणवीरने अचानक या चित्रपटातून माघार घेतल्यामुळे निर्मात्यांचे सुमारे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप केला जात होता. या सर्व प्रकरणावर फरहान अख्तरने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
'हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत फरहानला जेव्हा या वादाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने रणवीरचे थेट नाव न घेता खंत व्यक्त केली. फरहान म्हणाला, "या संपूर्ण प्रकरणातून मी एकच गोष्ट शिकलो आहे की, आयुष्यात नेहमी अनपेक्षित गोष्टींसाठी तयार राहायला हवे. जोपर्यंत एखादी गोष्ट प्रत्यक्षात पूर्ण होऊन तुमच्या समोर येत नाही, तोपर्यंत ती गोष्ट हलक्यात घेता कामा नये. म्हणजेच गृहित धरता कामा नये."
तो पुढे म्हणाला, "करिअरच्या सुरुवातीला जेव्हा मी आमिर खान, प्रिती झिंटा, अक्षय खन्ना, डिंपल कपाडिया, सैफ अली खान आणि माझा पार्टनर रितेश सिधवानी एकत्र येऊन म्हणालो, चला हा (दिल चाहता है) सिनेमा बनवू. त्याच वेळी माझा शानदार प्रवास सुरु झाला. हा प्रवास कायमच त्या सर्व लोकांसोबत काम करण्याबाबतीत होता. त्यांच्यासोबत मला काम करताना मजा यायची. तेव्हा मी माझ्या आवडीच्या कलाकारांना दिग्दर्शित केलं आणि आवडीच्या दिग्दर्शकांच्या सिनेमात मी स्वत: अभिनयही केला."
पुढे तो हसतच म्हणाला, "जेव्हा अशा प्रकारचे अडथळे येतात तेव्हा मला कधी कधी वाटतं की मी पुन्हा अभिनयाकडेच वळलो पाहिजे. ज्यामुळे मला अशा गोष्टींशी डीलच करावं लागणार नाही."
काही दिवसांपूर्वी अशा चर्चा होत्या की, रणवीर आणि फरहान यांच्यात तडजोड झाली आहे. रणवीरने चित्रपटासाठी घेतलेली १० कोटी रुपयांची साइनिंग अमाऊंट परत करण्याची तयारी दर्शवली असून, त्याने आपल्या 'प्रलय' या आगामी चित्रपटात एक्सल एंटरटेनमेंटला भागीदारी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, 'इंडियन एक्सप्रेस'ने फरहानच्या प्रोडक्शन हाऊसच्या हवाल्याने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत, ज्यामुळे हा वाद अजूनही मिटलेला नसल्याचे दिसून येते.
थोडक्यात सांगायचे तर, शाहरुख खाननंतर 'डॉन'ची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झालेला रणवीर सिंह आता या प्रोजेक्टचा भाग नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ४० कोटींच्या नुकसानीचा हा दावा आणि कायदेशीर पेचप्रसंग यामुळे 'डॉन ३'चे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे. आता फरहान या भूमिकेसाठी पुन्हा नव्या अभिनेत्याचा शोध घेणार की हा प्रकल्प थंड बस्त्यात जाणार, याकडे सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Farhan Akhtar reflects on 'Don 3' turmoil after Ranveer Singh's exit. He emphasizes learning to expect the unexpected. Production house denies settling monetary disputes. Future of 'Don 3' uncertain.
Web Summary : रणवीर सिंह के निकलने के बाद फरहान अख्तर ने 'डॉन 3' की उथल-पुथल पर विचार किया। उन्होंने अप्रत्याशित की अपेक्षा करने के बारे में सीखने पर जोर दिया। प्रोडक्शन हाउस ने मौद्रिक विवादों को निपटाने से इनकार किया। 'डॉन 3' का भविष्य अनिश्चित।