Join us

'सैयारा'ची क्रेझ काहीच नाही... ४४ वर्षांपूर्वी 'हा' चित्रपट पाहून प्रेमी युगुलांनी संपवलं होतं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:27 IST

हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक "क्लासिक चित्रपट" म्हणून ओळखला जातो.

अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनित पड्डा (Aneet Padda) यांच्या 'सैयारा' चित्रपटामुळं तरुणाईमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. १८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील भावनिक दृश्यांमुळं अनेकजण थिएटरमध्ये रडताना दिसत आहेत. यात जेन-झींची संध्या अधिक आहे. पण, अशा प्रकारची क्रेझ निर्माण करणारा  'सैयारा' हा काही पहिलाचं चित्रपट नाही. तब्बल ४४ वर्षांपूर्वी एक असा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यानं प्रेक्षकांच्या काळजाला हात घातल होता. त्या चित्रपटातील प्रेमकथेने इतका तीव्र प्रभाव टाकला की काही प्रेमी युगुलांनी प्रत्यक्षात आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला होता.

त्या चित्रपटाचं नाव आहे 'एक दूजे के लिए' (Ek Duuje Ke Liye)..हा चित्रपट बालचंदर यांच्या तेलुगू चित्रपट 'मारो चरित्र'चा हिंदी रिमेक होता.चित्रपटाची कथा अशी आहे की, उत्तर भारतात राहणारे तमिळ भाषिक वासू आणि त्याच्या शेजारी राहणारी सपना यांच्यात एकमेकांची भाषा समजत नसतानाही प्रेम फुलतं. मात्र, दोन्ही कुटुंबं त्यांच्या प्रेमाला विरोध करतात. सर्व प्रयत्न करूनही जेव्हा त्यांचं प्रेम मान्य केलं जात नाही, तेव्हा अखेरीस वासू आणि सपना दोघंही कड्यावरून उडी मारून आत्महत्या करतात. या चित्रपटात  कमल हासन आणि रती अग्निहोत्री हे मुख्य भुमिकेत होते. जसं अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी 'सैयारा' चित्रपटातून पदार्पण केलं आणि रातोरात स्टार बनले, त्याचप्रमाणे 'एक दुजे के लिए' चित्रपटातून कमल हासन आणि रती अग्निहोत्री हे रातोरात स्टार बनले होते. 

कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांनी वासू आणि सपना या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या हृदयात कायमची जागा मिळवली. त्यांच्या अभिनयामुळे आणि चित्रपटाच्या कथेमुळे या दोघांची जोडी प्रेक्षकांना इतकी भावली की अनेक जोडी स्वतःला वासू-सपना समजू लागले. वासू आणि सपनाप्रमाणेच काही जोडप्यांनी समाजात त्यांचं प्रेम मान्य होत नसल्यानं आत्महत्याही केल्या होत्या. त्याकाळी अशी अनेक प्रकरणं समोर आली होती.

त्याकाळी या सिनेमानं १० कोटी पेक्षा जास्त कमाई केली होती.  ज्यामुळे तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला होता. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे चित्रपटाच्या संगीताचं खूप कौतुक झालं होतं.  २८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये  एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांनी गायलेले आणि आनंद बक्षी यांनी लिहिलेले "तेरे मेरे बीच में" या गाण्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार मिळाला होता. हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक "क्लासिक चित्रपट" म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल तर तो युट्यूबवर उपलब्ध आहे. 

टॅग्स :कमल हासनसिनेमा