Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी बोललीच पाहिजे अशी सक्ती माझ्यावर करु नका..."; सुनील शेट्टी स्पष्टच म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:59 IST

सुनील शेट्टी मराठी भाषा सक्तीवर त्याचं परखड मत व्यक्त केलं आहे. सुनीलने जे विधान केलंय त्याची खूप चर्चा आहे

सध्या 'बॉर्डर २' सिनेमामुळे मूळ 'बॉर्डर' सिनेमातील अभिनेता सुनील शेट्टी चांगलाच चर्चेत आहे. सुनील शेट्टी कायमच महाराष्ट्राबद्दल त्याचं प्रेम दर्शवत असतो. अशातच एका ठिकाणी भावना व्यक्त करताना सुनीलने भाषा सक्ती आणि मराठी भाषेबद्दल त्याचं परखड मत व्यक्त केलं आहे. "बळजबरी नको, मी माझ्या इच्छेने बोलेन"

ANI ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सुनील शेट्टीने भाषेच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, "मी खूप लहान असताना माझ्या गावाहून (मंगळुरू) इथे आलो. संधी शोधण्यासाठी मी इथे आलो होतो, माझी ओळख बदलण्यासाठी नाही. भौगोलिक परिस्थिती बदलली तरी तुमची मूळ ओळख बदलत नाही. माझ्या प्रत्येक कामात तुम्हाला 'मंगळुरू'ची झलक दिसेल."

जेव्हा त्याला मराठी भाषेबद्दल विचारले जाते, तेव्हा तो स्पष्टपणे सांगतो, "जेव्हा कोणी मला विचारतं की मराठीचं काय? तेव्हा मी म्हणतो, मराठीचं काय? मराठी बोललीच पाहिजे अशी सक्ती माझ्यावर करू नका. मी ती भाषा तेव्हाच बोलेन जेव्हा माझी इच्छा असेल. मला भाषा बोलण्यासाठी भाग पाडू नका."

सुनील शेट्टीने पुढे स्पष्ट केले की, त्याचा विरोध भाषेला नसून ती लादण्याला आहे. मुंबई ही आपली 'कर्मभूमी' असल्याचे मान्य करत तो म्हणाला, "जर ही माझी कर्मभूमी आहे, तर इथली भाषा शिकल्याने अनेक लोक आनंदी होतील, हे मला माहित आहे. भाषा हे संवादाचे माध्यम आहे, कोणाच्या दबावाखाली येऊन पाळायचा नियम नाही."

आपल्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाबद्दल बोलताना तो आत्मविश्वासाने म्हणाला, "मुंबईत राहणारी आजची अनेक महाराष्ट्रीयन मुले जितकी चांगली मराठी बोलत नसतील, त्यापेक्षाही उत्तम मराठी मी बोलतो." त्याच्या मते, जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतःच्या इच्छेने शिकतो, तेव्हा ती अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करता येते. अशाप्रकारे सुनीलने त्याचं मत व्यक्त केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Suniel Shetty: Don't force Marathi; I'll speak when I want.

Web Summary : Suniel Shetty, amidst 'Border 2' buzz, asserts his love for Maharashtra but opposes forced language adoption. He emphasizes speaking Marathi should be by choice, not compulsion. He speaks better Marathi than many young Maharashtrians. He values voluntary language learning.
टॅग्स :सुनील शेट्टीबॉलिवूडमराठी चित्रपटमराठी भाषा दिन 2020मराठी