Chandra Barot Passes Away: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचं निधन झालं आहे. आज रविवारी मुंबईत त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळते आहे. गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रा बारोट हे ८६ वर्षांचे होते आणि फुफ्फुसांच्या काही समस्यांमुळे गेल्या ६-७ वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
'डॉन'च्या आधी चंद्रा बारोट यांनी 'पूरब और पश्चिम', 'यादगार', 'शोर',’रोटी कपडा और मकान’ या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. परंतु, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'डॉन' चित्रपटाचीची क्रेझ आजही आहे. दरम्यान, अचंद्रा बारोट यांच्या निधनानंतर अभिनेता फरहान अख्तरने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय, 'डॉन'चे दिग्दर्शक आता आपल्यात नाहीत हे ऐकून दुःख झाल. चंद्रा बारोट जी यांच्या आत्म्याला शांती मिळो. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत ."
अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. हा चित्रपट १९८७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ डबल रोलमध्ये झळकले होते. त्याचबरोबर या चित्रपटात झीनत अमान, प्राण यांच्यादेखील मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही.
मित्रावरील कर्ज फेडण्यासाठी केला 'डॉन' चित्रपट...
प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर नरिमन इराणी यांनी सुनील दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या 'जिंदगी जिंदगी' या चित्रपटाची निर्मिती केली होती. पण हा चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यांच्यावर १२ लाखाचे कर्ज झाले. या चित्रपटानंतर ते 'रोटी कपडा मकान' या चित्रपटाच्या टीमसोबत काम करत होते. त्यावेळी त्यांची ओळख चंद्रा बारोट यांच्यासोबत झाली. त्या दोघांची या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घट्ट मैत्री झाली. इराणी यांनी एकदा चंद्रा यांच्याकडे हजार रुपये मागितले. त्यांनी कारण न विचारता केवळ मैत्रीखातर इराणी यांना लगेचच पैसे दिले. पण काही दिवसांनी इराणी यांनी पुन्हा १० हजार रुपये मागितल्यावर त्यामागचे कारण त्यांनी विचारले. त्यावर इराणी यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जाबाबत चंद्रा यांना सांगितले.
'डॉन' या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रा यांनी तर निर्मिती इराणी यांनी केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कलेक्शन केले आणि त्यातून इराणी यांच्या पत्नीने त्यांच्यावर असलेले सगळे कर्ज फेडले.