अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आगामी 'डॉन ३' (Don 3) सिनेमात दिसणार आहे. शाहरुख खानच्या जागी 'डॉन' म्हणून रणवीर सिंहची वर्णी लागली आहे. सध्या रणवीर 'धुरंधर' सिनेमामुळे चर्चेत आहे. याचा टीझर सर्वांच्या पसंतीस पडला आहे. यानंतर 'डॉन ३' चं शूट सुरु होणार असल्याचा अंदाज आहे. रणवीरसोबत 'डॉन ३' मध्ये कियारा अडवाणी किंवा क्रिती सेनन दिसणार असल्याची चर्चा आहे. तर खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता विक्रांत मेस्सीला ऑफर होती. मात्र आता त्याच्या ऐवजी दुसरा अभिनेता व्हिलनची भूमिका करणार असल्याचं समोर आलं आहे.
फरहान अख्तरने 'डॉन' आणि 'डॉन २'चं दिग्दर्शन केलं होतं. आता तो 'डॉन ३'वर काम सुरु करणार आहे. याआधी त्याचा '१२० बहादुर' सिनेमा रिलीज होणार आहे ज्यात तो अभिनेता आहे. 'डॉन ३'साठी विक्रांत मेस्सीला ऑफर देण्यात आली होती. मात्र स्क्रीप्ट पसंत न पडल्याने विक्रांतने सिनेमातून काढता पाय घेतला आहे. आता त्याच्या जागी मेकर्स बिग बॉस विजेता करणवीर मेहराला (Karanveer Mehra) खलनायक म्हणून घेण्याच्या विचारात आहेत. असं झालं तर करणवीर मेहरासाठी हा बॉलिवूडमधला मोठा ब्रेक असू शकतो.
करणवीर मेहराने नुकतचं बिग बॉस १८ ची ट्रॉफी पटकावली. तसंच तो 'खतरो के खिलाडी १४'चाही विजेता होता. गेल्या काही वर्षात तो टीव्हीवर लोकप्रिय ठरत आहे. त्याची हीच लोकप्रियता पाहता त्याला 'डॉन ३'मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. नुकतंच करणवीरला फरहान अख्तरच्या Excel Entertainment ऑफिसमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं. तेव्हापासून त्याच्या डॉन ३ मधील एन्ट्रीची चर्चा सुरु झाली आहे.