26/11 Terror Attack Survivor Review Dhurandhar : २६ /११ अर्थात २६ नोव्हेंबर २००८… ही तारीख कुणीही विसरू शकत नाही. समुद्रावाटे आलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. त्या घटनेत १० पैकी ९ दहशतवाद्यांना जागीच ठार करण्यात आले, तर फक्त अजमल कसाब जिवंत पकडला गेला. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याला फाशी देण्यात आली. या हल्ल्यात १६० हून अधिक लोक मारले गेले. या घटनेला इतकी वर्षं उलटली, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत. नुकत्यात प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' चित्रपटात या घटनेचा उल्लेख आहे. 'धुरंधर'मध्ये एक असा प्रसंग आहे जिथे संपूर्ण स्क्रीन लाल होते आणि पार्श्वभूमीवर २६/११ च्या दहशतवाद्यांनी त्यांच्या सूत्रधारांशी केलेल्या प्रत्यक्ष संभाषणाचा ऑडिओ ऐकू येतो. यात दहशतवादी महिला आणि मुलांनाही न सोडण्याबद्दल बोलताना ऐकू येतात. या दृश्यानं प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून टाकलं. त्यामुळे मुंबई हल्ल्याच्या जुन्या वेदनादायक जखमा पुन्हा ताज्या झाल्या. या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या रजिता बग्गा यांनी चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
रजिता बग्गा यांनी त्या काळ्या रात्रीचा थरार प्रत्यक्ष अनुभवला होता. २६/११ च्या हल्ल्यावेळी त्या आपल्या पतीसोबत दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमध्ये होत्या. दहशतवाद्यांनी जेव्हा हॉटेलवर ताबा मिळवला, तेव्हा रजिता तिथे तब्बल १४ तास मृत्यूच्या छायेत अडकल्या होत्या. सुदैवाने, सुरक्षा दलांच्या धाडसामुळे त्यांची सुखरूप सुटका झाली. पण तो थरार त्या कधीच विसरू शकल्या नाहीत. आता 'धुरंधर' सिनेमा पाहिल्यावर त्याच भयानक आठवणींनी रजीता परत हळहळल्या. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपट निर्मात्यांचे आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचे आभार मानले. त्यांच्या मते, या चित्रपटाने केवळ मनोरंजन न करता, २६/११ ला नेमकं काय घडलं होतं आणि आपल्या देशाच्या शत्रूंनी किती क्रूरता दाखवली होती, याचे सत्य मांडले आहे.
रजिता बग्गा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले की, "२६/११ च्या त्या रात्री मी माझे पती अजय बग्गा यांच्यासोबत ताज हॉटेलमध्ये होते. आम्ही सुदैवाने त्या हल्ल्यातून वाचलो आणि १४ तासांनंतर आमची सुटका झाली. 'धुरंधर'मधील माझ्यासाठी सर्वात हादरवून टाकणारं दृश्य म्हणजे ती लाल स्क्रीन... ज्यावर २६/११ च्या दहशतवाद्यांची आणि त्यांच्या हँडलर्सची ऑडिओ रेकॉर्डिंग वाजवण्यात आली".
पुढे त्या म्हणाल्या, "हँडलर्सकडून दिले जाणारे आदेश ऐकणं फारच क्रूर, अमानवी आणि घृणास्पद होतं. प्रत्येक बॉम्बस्फोटावर जल्लोष केला जात होता. हे सगळं ऐकताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर आणि प्रत्येक निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूनंतर हँडलर्स जल्लोष करत होते. हे पाहून जर आपल्याला राग येत नसेल आणि देशाच्या सुरक्षेसाठी अधिक ठाम राहण्याची भावना निर्माण होत नसेल तर मग ती आणखी कशामुळे होईल? १७ वर्षे उलटली आहेत, पण त्या रात्री घडलेलं आणि आमच्याबरोबर काय घडू शकलं असतं, हे आठवून मी आजही आतून अस्वस्थ होते".
'धुरंधर' चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं आणि संपुर्ण टीमचं कौतुक करत त्या म्हणाल्या, "'धुरंधर' आणि त्याच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. आदित्य धर यांचे आभार की, ज्यांनी केवळ दोन-तीन मिनिटांतच नव्या पिढीला २६/११ रोजी प्रत्यक्षात काय घडलं होतं हे समजावून सांगितलं". रजिता यांच्या पोस्टवर दिग्दर्शक आदित्य धर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, "तुमच्या शब्दांनी आम्हाला पुन्हा एकदा जाणीव करून दिली की ही कथा सांगणे का गरजेचं होतं. तो क्षण एका क्रूर सत्याचं चित्रण करण्यासाठीच तयार केला होता. तो प्रयत्न यासाठी होता की,आपण ते लक्षात ठेवावं, एकजुटीनं उभं राहावं आणि पुन्हा कधीही अशी वेळ पुन्हा परत येऊ देऊ नये. आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद".
Web Summary : 26/11 survivor Rajita Bagga, who was in the Taj, recounts the horror after watching 'Dhurandhar'. A scene with terrorist audio deeply disturbed her, reviving painful memories of the attacks. She praised the film for its truthful portrayal.
Web Summary : 26/11 हमले में बचीं राजिता बग्गा ने 'धुरंधर' देखने के बाद ताज होटल में बिताए खौफनाक पल याद किए। फिल्म में आतंकियों के ऑडियो ने उन्हें झकझोर दिया। उन्होंने फिल्म को सच्चाई दिखाने के लिए सराहा।