बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. ६० आणि ७० च्या दशकात सहकलाकार म्हणून विशेष ओळख मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नाझिमा यांचे निधन झालं. ११ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७७ वर्षांच्या होत्या. नाझिमा दादर येथे दोन मुलांसोबत राहत होत्या. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी आणि जवळच्या मित्रपरिवाराने दिली.
नाझिमांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे खरे नाव मेहर उन निसा होते. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेसृष्टीशी संबंधित होती. त्यांच्या नातेवाइकांपैकी हस्न बानो या प्रसिद्ध दिग्दर्शक अस्पी इराणी यांच्या पत्नी होत्या. नाझिमांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. ‘बेबी चंद’ या नावाने त्या ओळखल्या जात. ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंं. त्यानंतर ‘देवदास’, ‘बिराज बहू’ आणि ‘अब दिल्ली दूर नहीं’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या.
१९६०-७० च्या दशकात नाझिमा मुख्यत्वे नायिकेच्या बहिणी किंवा मैत्रिणीच्या भूमिका करत असत. सहज अभिनय आणि भावपूर्ण संवादफेकीमुळे नाझिमा यांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांचं वेगळं स्थान निर्माण झालं. ‘अरज़ू’ चित्रपटातील त्यांची भावनिक भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यांनी ‘निशान’, ‘राजा और रंक’, ‘औरत’, ‘डोली’, ‘आए दिन बहार के’, ‘प्रेम नगर’, ‘अनुराग’, ‘बेईमान’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. राजेश खन्ना, संजीव कुमार, धर्मेंद्र यांसारख्या त्या काळातील आघाडीच्या कलाकारांसोबत त्यांनी पडद्यावर संस्मरणीय भूमिका साकारल्या.
गेल्या काही वर्षांपासून त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहात होत्या. नाझिमांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक गुणी आणि संवेदनशील अभिनेत्री गमावल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.