अभिनेत्री दीपिका पादुकोण काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिकाला आधी 'स्पिरीट' सिनेमातून काढलं. दीपिकाच्या अवास्तव, अवाजवी मागण्या होत्या म्हणून तिला सिनेमातून काढण्यात येत असल्याचं त्याने सांगितलं. तर आता 'कल्कि'च्या सीक्वेलमधूनही दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दीपिकावर 'अनप्रोफेशनल' असा आरोप लावण्यात आला. या सगळ्या चर्चांनंतर आता दीपिकाने एक खास फोटो पोस्ट केला असून त्याच्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे.
अभिनेता शाहरुख खान सध्या परदेशात 'किंग' सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. आता दीपिका पादुकोणही या सिनेमाच्या शूटसाठी परदेशात पोहोचली आहे. शाहरुख आणि दीपिकाचा एकत्र हा ६ वा सिनेमा असणार आहे. शाहरुखच्या हात धरलेला फोटो पोस्ट करत तिने लिहिले,"जवळपास १८ वर्षांपूर्वी ओम शांती ओम शूटिंगवेळी शाहरुखने मला पहिली शिकवण दिली ती म्हणजे 'कोणताही सिनेमा बनवतानाचा अनुभव आणि ज्या लोकांसोबत तुम्ही तो बनवत आहात ते लोक यापेक्षा जास्त महत्वाचं काही नाही अगदी त्या सिनेमाचं यशही नाही.' मी याच्याशी १०० टक्के सहमत आहे आणि तेव्हापासून माझ्या प्रत्येक निर्णयात मी हीच शिकवण लक्षात ठेवली आहे. कदाचित म्हणूनच आपण पुन्हा एकत्र आपला ६ वा सिनेमा बनवत आहोत. 'किंग'चा पहिला दिवस."
दीपिकाने एकाच पोस्टमधून सर्वांची बोलती बंद केली आहे. तसंच शाहरुखच्या 'किंग'मध्ये काम करत असल्याची अधिकृत घोषणाही केली आहे. दीपिकाच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.
दीपिका पादुकोणने गेल्या वर्षी मुलीला जन्म दिला. यानंतर तिच्या हातातून दोन महत्वाचे प्रोजेक्ट्स गेले. दीपिकाने ८ तासांची शिफ्ट, भरघोस मानधन, प्रॉफिट शेअर, लक्झरी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था अशा काही मागण्या केल्याची चर्चा होती. म्हणूनच तिला दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शकांनी सिनेमातून काढलं असंही बोललं गेलं होतं. 'किंग' नंतर दीपिका दिग्दर्शक अॅटलीच्या सिनेमातही दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अल्लू अर्जुन असून दोघंही दमदार अॅक्शन सीन्स देणार आहेत.