Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cannes गाजवून आलेल्या मराठमोळ्या छाया कदम यांचं घरी जंगी स्वागत, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:50 IST

छाया कदम घरी येताच कुटुंबियांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं.

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी नुकतंच कान्समध्ये नाव उंचावलं. त्यांच्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' सिनेमाची कान्ससाठी निवड झाली. इतकंच नाही तर कान्सच्या ७७ वर्षांच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ग्रँड प्रिक्स पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय चित्रपट बनला. या सिनेमासाठीच छाया कदम कान्सला गेल्या होत्या. तिथे छाया यांची एन्ट्री झालेली पाहून मराठी प्रेक्षकांचा ऊर भरुन आला. जगभरातून त्यांचं कौतुक होत आहे. नुकतंच अभिनेत्री भारतात घरी परतली असून कुटुंबियांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय.

छाया कदम घरी येताच कुटुंबियांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं. आधी विमानतळावरही आप्तेष्टांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन केलं. घरी पोहोचताच पूजेचं ताट घेऊन कुटुंबियांनी त्यांना फुलांचा हार घातला. सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटत होता. या गोड सरप्राईजसाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले. 

कान्स सोहळ्यासाठी छायाने हटके पेहराव केला होता. नाकात नथ आणि आईची साडी नेसून छाया कदम कान्सच्या रेड कार्पेटवर गेल्या. त्यामुळे त्या विशेष प्रकाशझोतात आल्या. यानंतर दुसऱ्या लूकमध्ये काळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट असलेल्या गाऊनमध्ये त्यांनी लक्ष वेधून घेतलं. 

छाया कदम यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही कलाविश्वात नाव कमावलं आहे. त्यांनी 'सैराट','फँड्री' आणि 'न्यूड'सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. तर त्यांचा नुकताच आलेला 'लापता लेडीज' हा हिंदी सिनेमाही तुफान गाजला. 

टॅग्स :मराठी अभिनेताकान्स फिल्म फेस्टिवलसेलिब्रिटीबॉलिवूड