Join us

Chhaava Movie: भल्याभल्यांना जमलं नाही ते 'छावा'ने करून दाखवलं; ५ दिवसांत बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाल्लं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:46 IST

प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी फोडली आहे. 'छावा'ने बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाऊन टाकलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा'छावा' हा ऐतिहासिक सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. बहुचर्चित आणि बिग बजेट असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचं  बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी फोडली आहे. 'छावा'ने बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाऊन टाकलं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात छावाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. विकी कौशलचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. 'छावा'ने  प्रदर्शनाच्या दिवशीच तब्बल ३१ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ३६.५ कोटींची कमाई केली. रविवारी सर्वाधिक म्हणजे ४८.५ कोटींचा गल्ला सिनेमाने जमावला. 

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. मंडे टेस्टमध्येही हा सिनेमा पास झाला आहे. सोमवारी सिनेमाने २४ कोटींची कमाई केली. तर आता पाचव्या दिवसांचं कलेक्शनही समोर आहे. या सिनेमाने पाचव्या दिवशी अंदाजे २४.५० कोटी कमावले आहेत. 'छावा'ने पाच दिवसांत एकूण १६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'छावा'ने बॉलिवूडला २०२५ वर्षाची दमदार सुरुवात करून दिली आहे. 'छावा'मध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलं असून सिनेमात अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांचीही भूमिका आहे. मॅडॉक फिल्म्स बॅनरअंतर्गत दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदाना