Bollywood Movies : १९७५ हे वर्ष बॉलिवूडसाठी सुवर्णकाळ ठरलं होतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच वर्षामध्ये गाजलेला 'शोले' चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. नुकतीच या चित्रपट प्रदर्शित ५० वर्षांचा काल उलटला आहे. त्याच वर्षी आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्याच्या भावनिक कथानकाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा चित्रपट म्हणजे 'जय संतोषी मॉं' आहे. अवघ्या पाच लाखांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १० कोटी रुपये इतकी कमाई केली होती.
दरम्यान, सुरुवातीच्या दिवसांमध्ये 'जय संतोषी माँ' ची बॉक्स ऑफिसवर सुरुवात संथ झाली. मात्र, काही दिवसांतच या चित्रपटाने डोकं वर काढलं. या चित्रपटात कोणतीही तगडी स्टारकास्ट नसताना गोल्डन जुबली साजरी केली होती. त्याकाळी हा चित्रपट पाहण्यासाठी लोक अगदी लांबचा पल्ला गाठत बैलगाड्या आणि बसमधून येत होते. शिवाय चित्रपटगृहाबाहेर जाण्यापूर्वी त्यांच्या चप्पल काढत असत. कमी बजेट असूनही हा मायथालॉजिकल चित्रपट प्रेक्षकांवर अशी जादू करेल याची कोणीही कल्पना देखील केली नव्हती. माऊथ पब्लिसिटी आणि चाहत्यांच्या भक्तीमुळे तो सुपरहिट झाला. हा चित्रपट सलग ५० आठवडे थिएटरमध्ये चालला. आजवर या चित्रपटाचा कोणीही रेकॉर्ड मोडू शकलं नाही.
'जय संतोषी मॉं' चित्रपटात संतोषी माँची भूमिका अभिनेत्री अनिता गुहा यांनी साकारली होती. आपल्या सहज सुंदर अभिनयाने या नायिकाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. असं सांगण्यात म्हणतात की, या सिनेमानंतर लोक खरोखर त्यांना संतोषी माता समजून त्यांच्या पाया पडत असतं. या सिनेमात काम करण्यास त्यांनी होकार दिला खरा. पण तोपर्यंत यांनी कधीही संतोषी मातेचे नाव ऐकले नव्हते. सिनेमात काम करत असताना हा सिनेमा एवढा गाजेल, असे त्यांना वाटले नव्हते. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला.