Join us

बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:03 IST

Raja Raghuvanshi And Sonam Raghuvanshi : इंदूरमधील राजा आणि सोनम रघुवंशीवर चित्रपट बनवण्यात येणार आहे.

इंदूरमधील राजा आणि सोनम रघुवंशीवर चित्रपट बनवण्यात येणार आहे. 'हनीमून इन शिलाँग' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. राजा रघुवंशीच्या कुटुंबाने मुंबईतील एका चित्रपट दिग्दर्शकाला यासाठी परवानगी दिली आहे. दिग्दर्शन आणि शुटिंगचं बहुतेक काम इंदूरमध्येच केलं जाईल.

राजा रघुवंशीच्या भावाने माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील दिग्दर्शक एसपी निंबायत यांनी आमच्याशी चित्रपट बनवण्याबाबत चर्चा केली होती. ज्याला आम्ही आमची संमती दिली आहे. या चित्रपटात राजाचं बालपण ते हनीमून आणि हत्या अशी कथा असेल. दिग्दर्शक एसपी निंबायत यांनी यापूर्वी कबड्डी आणि लौट आओ पापा हे चित्रपट बनवले आहेत.

११ मे रोजी राजाचं लग्न इंदूरमधील रहिवासी सोनमशी झालं होतं. काही दिवस सासरच्या घरी राहिल्यानंतर सोनम तिच्या माहेरी गेली. त्यानंतर, तिथून तिने हनीमूनसाठी शिलाँगला जाण्याचा प्लॅन केला. राजाला शिलाँगला जायचं नव्हतं पण सोनमने तिकिटंही बुक केली आणि हनिमूनसाठी काही खरेदीही केली. त्यानंतर दोघेही २० तारखेला इंदूरहून शिलाँगला रवाना झाले.

२३ मे रोजी दुपारी १:३० वाजता सोनमने तिच्या सासूला फोन केला. सासू आणि सून यांच्यातील हा शेवटचा संवाद होता. या शेवटच्या संभाषणादरम्यान सोनमने स्वतः तिच्या सासूला सांगितले की ते जंगलात फिरायला आले आहेत. तिथे धबधबा आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता सोनम आणि राजा दोघांचाही फोन बंद झाला. राजा आणि सोनमच्या कुटुंबाने इंदूर पोलिसांना याबद्दल माहिती दिली. दोघांचा शोध सुरू झाला. सुरुवातीला काहीतरी अनुचित घडण्याची भीती होती. 

२ जून रोजी शिलाँगच्या वेसाडोंग धबधब्याजवळ राजाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, ज्याच्या डोक्यावर खोल जखमा होत्या. पण सोनमचा कोणताही पत्ता नव्हता. सोनम अनेक दिवस बेपत्ता होती. ९ जून रोजी सोनमने वाराणसीजवळील गाझीपूर जिल्ह्यातील एका ढाब्यावरून तिचा भाऊ गोविंदला फोन केला आणि तिच्यासोबत काहीतरी वाईट घडल्याचं सांगितलं. गोविंदने पोलिसांना कळवलं. मेघालय पोलीस गाझीपूरला पोहोचले आणि तेथून सोनमला ताब्यात घेतलं.  त्यानंतर सोनमने बॉयफ्रेंडच्या मदतीने राजाचा काटा काढला.  

टॅग्स :बॉलिवूडगुन्हेगारी