Sajid Khan:साजिद खान (Sajid Khan) हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. हे बेबी, हाऊलफुल्ल, हिम्मतवाला तसेच हमशक्ल यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. दरम्यान, साजिद खान मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या चित्रपटांसह बेधडक वत्कव्यामुळेही ते अनेकांचं लक्ष वेधून घेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या एका विधानाने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
अलिकडेच, साजिद खान यांनी कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "आजच्या काळात इंडस्ट्रीत कोणी हिरो नाही, आता फक्त मुख्य कलाकार उरले आहेत. "त्यादरम्यान, जुन्या काळातील नायकांच्या जीवनशैलीबद्दल बोलताना ते म्हणाले,"पूर्वीचे नायक आलिशान जीवन जगत होते. सध्याच्या घडीला इंडस्ट्रीत नायक नाहीत. पूर्वी चित्रपटांमध्ये नायक असायचे पण आता फक्त चित्रपटांमध्ये ते मुख्य पात्र बनलं आहे. आता कोणीही चित्रपट करू शकतो, कारण आता नायकाचा प्रश्नच उरलेला नाही."
त्यानंतर पुढे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा दाखला देत साजिद खान म्हणाले, "आजही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नायकाला खरं महत्त्व दिलं जात आहे. म्हणूनच कोणत्याही चित्रपटात त्याची एन्ट्री दमदार दाखवली जाते. शिवाय दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये समाजासाठी चुकीचा संदेश जात असेल असं कधी दाखवलं जात नाही. याचंच कारण आहे की 'सुपरलीड' हा शब्दाचा वापर कुठेही न होता 'सुपरहिरो' केला जातो. परंतु आज आपल्याकडे असे खूप कमी नायक उरले आहेत."
पूर्वीच्या नायकांसाठी बॉडी बिल्डिंग महत्वाचं नव्हतं-
त्यानंतर साजिद खान पुढे म्हणाले, “अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती सारखे अभिनेते हे खरे नायक होते. पडद्यावर त्यांनी कधी खलनायक तर कधी नायक साकारला. तरी सुद्धा ते चाहत्यांना आकर्षित करायचे. त्यामुळे त्यावेळच्या नायकांना बॉडी बिल्डिंगची काही गरजच नव्हती. सलमान खानने बॉलीवूडमध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेझ आणली. 'मैने प्यार किया'च्या पहिल्या पोस्टरमध्ये त्याचे सिक्स-पॅक अॅब्स पाहून लोक थक्क झाले. पण आता ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. सिक्स-पॅक असणे आता आवश्यक आहे." असा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला.