Homebound Movie: भारतीय सिनेमा जागतिक पातळीवर नवनवीन प्रयोग करत विक्रम रचत आहे,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकतीच जागतिक सिनेविश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या २०२६ च्या ऑस्करसाठी दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या 'होमबाउंड' चित्रपटाची भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी, २०२६ च्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर श्रेणीमध्ये या चित्रपटाची अधिकृत निवड झाली. ऑस्कर हा जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कारांपैकी एक आहे. भारतीय चित्रपटांचंही ऑस्कर मिळवण्याचं स्वप्न फार पूर्वीपासून राहिलेलं आहे. यंदाच्या या पुरस्कारांमध्ये ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपटाला नॉमिनेशन मिळाल्याने सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दरम्यान, हा चित्रपट अद्याप भारतात प्रदर्शित झालेला नाही. येत्या २६ सप्टेंबरला होमबाउंड सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.
काल शुक्रवारी कोलकाता येथे पार पडलेल्या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान २४ भारतीय चित्रपटांमधून होमबाउंड ला ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. प्रख्यात दिग्दर्शक एन.चंद्रा या नेतृत्वाखाली परीक्षक समितीकडून या चित्रपटाची भारताकडून ऑस्करसाठी निवड केली गेली आहे. यंदाच्या २०२५ च्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) होमबाउंड या चित्रपटाने इंटरनॅशनल पीपल्स चॉईस पुरस्कारासाठी उपविजेतेपदावर मोहोर उमटवली. शिवाय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही होमबाउंड चित्रपटाला ९ मिनिटांचं स्टॅंडिंग ऑवेशन मिळालं होतं.
भावुक करणारं कथानक...
दिग्दर्शक नीरज घायवानच्या 'होमबाऊंड'मध्ये ईशान खट्टर आणि विशाल जेठवा हे दोघे बालपणीचे मित्र दिसतात. दोघांचंही पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे आणि त्यासाठी ते खूप मेहनतही करतात. परंतु काही कारणास्तव त्यांना भ्रष्ट व्यवस्थेचा स्थापना करावा लागतो. त्यामुळे दोघेही नाउमेद होतात. या सिनेमात ईशान मोहम्मद शोएबचे पात्र साकारत आहे, तर विशाल चंदन कुमारच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनरखाली करण्यात आली आहे.