Join us

'आम्ही रोमॅण्टिक सीन का देऊ शकत नाही?' आजीची भूमिका ऑफर होण्यावर संतापल्या आशा पारेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 16:25 IST

Asha parekh: आई आणि आजीच्या भूमिका ऑफर होण्याविषयी आशा पारेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलिवूडचा 60-70 चा काळ म्हटलं तर अनेक दिग्गज अभिनेत्रींचा फिल्मी प्रवास डोळ्यासमोरुन झरझर करत जातो. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे आशा पारेख (Asha Parekh). 'कटी पतंग'पासून ते 'कारवां'पर्यंत त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, बॉलिवूडवर राज्य करणारी ही अभिनेत्री गेल्या काही काळापासून कलाविश्वापासून दूर झाली आहे. फार क्वचित वेळा त्या एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये दिसून येतात. मात्र, त्यापलिकडे त्यांचा कलाविश्वाशी फारसा संबंध उरलेला नाही. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बॉलिवूडपासून फारकत घेण्यामागचं कारण सांगितलं. तसंच बिग बींना मिळत असलेल्या भूमिकांवरही भाष्य केलं.

"आजही अमिताभ बच्चन यांना लीड रोलमध्ये घेतलं जातं. त्यांना डोळ्यासमोर ठेऊन मुख्य भूमिका लिहिल्या जातात. मात्र, आमच्या बाबतीत तसं होत नाही. आम्हाला आता आई, आजी यांसारख्या भूमिकांसाठी विचारणा करण्यात येतं. जर आमच्यासाठी भूमिका लिहायची असेल तर त्यालाही काही महत्त्व असावं. आजीच्या भूमिका कोणाला करायला आवडतील?", असं आशा पारेख म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "आमच्या काळात लग्न झालं की अभिनेत्रीचं करिअर संपत होतं. आता मात्र, अभिनेत्रींचं लग्न होऊन त्यांना मुलंबाळं होतात तरी त्या काम करतात. अगदी ५०-५५ च्या अभिनेत्यासोबत २०-२२ वर्षाच्या अभिनेत्री रोमॅण्टिक सीन देतात. मग आम्ही का नाही करु शकत?"

दरम्यान, आशा पारेख यांनी १९५२ मध्ये बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९५७ मध्ये त्यांनी अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. आशा या पहिल्या सिनेमानंतर त्या रातोरात सुपरहिट झाल्या. या सिनेमानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

टॅग्स :आशा पारेखअमिताभ बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा