बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या बॅगची लंडनमधील हीथ्रो विमानतळावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उर्वशी एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी लंडनला गेली होती. विमानतळावर पोहोचल्यानंतर तिचं सामान मिळत नसल्याचं लक्षात आलं. तिच्या सांगण्यानुसार, या बॅगेत तब्बल ७० लाख रुपयांचे दागिने, मोठ्या ब्रँडचे कपडे, महागडं घड्याळ, अॅपल आयपॅड, क्रेडिट कार्ड्स, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.
उर्वशीच्या महागड्या वस्तू चोरीला
उर्वशीने ही माहिती स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती म्हणाली, “माझी बॅग चोरीला गेली आहे. या बॅगमध्ये हिरेजडित अंगठी, महागडं घड्याळ, आयपॅड, काही रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. मी खूप अस्वस्थ आणि निराश आहे. कृपया मला मदत करा.” सध्या हीथ्रो विमानतळ प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. विमानतळावरील CCTV फुटेज तपासले जात असून सुरक्षा यंत्रणा बॅगचा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. उर्वशीने स्थानिक पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.
उर्वशी रौतेला ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या या पोस्टमुळे तिचे चाहतेही चिंतेत आहेत आणि लवकरात लवकर तिचं नुकसान भरून निघावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. उर्वशी रौतेला आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा विम्बल्डनमध्ये पाहुणी म्हणून भाग घ्यायला गेली होती. त्यावेळी ही घटना घडली. उर्वशी यामुळे खूप निराश झाली असून तिचं चोरी झालेलं सामान लवकरात लवकर तिला मिळावं, याची सर्वांना आशा आहे