Kajol: हिंदी सिनेसृष्टीत अनेक नामवंत, प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे काजोल. निर्माता दिग्दर्शक सोमू मुखर्जी व अभिनेत्री तनूजा यांची कन्या काजोलने आपला साधेपणा, सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर लाखो करोडो सिनेरसिकांना वेड लावले होते.आजदेखील रसिक या अभिनेत्रीचे चित्रपट आवडीने पाहतात.१९९२, दिग्दर्शक राहुल रवैल यांच्या ‘बेखुदी’ या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं.या सिनेमात अभिनेता कमल सदानासोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने या चित्रपटाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
'ब्रूट इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काजोलने बेखुदी सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा शेअर केला. या चित्रपटाच्या एका सीनसाठी तिला पहिल्यांदा सहकलाकाराच्या कानशिलात मारण्याचा सीन करायचा होता. ज्यासाठी ती अजिबात तयार नव्हती,असंही तिने मुलाखतीत सांगतिलं. त्यादरम्यान, काजोल म्हणाली,"कोणत्याही कारणाशिवाय कोणाच्याही कानाखाली मारणं माझ्यासाठी कठीण गोष्ट होती. कमल इतका सज्जन माणूस आणि उत्तम कलाकार होता की त्याच्यावर हात उचलणं मला अजिबात जमत नव्हतं. हे माझ्या तत्वांच्या विरोधात होतं. "
त्यानंतर काजोलने सांगितलं की तिच्या या वागण्यामुळे दिग्दर्शक रागावले होते. सीन परफेक्ट व्हावा यासाठी ते तिला म्हणाले, "असं वाटतंय तू त्यांना शिक्षा देत आहेस. त्यामुळे सारखे रि-टेक घेत आहेस.त्यांचं ते बोलणं ऐकून मला असं वाटलं की मी काहीतरी चुकीचं केलंय. माझ्यासाठी तो खूप वेगळा अनुभव होता. तो सीन केल्यानंतर मी रडले आणि कमलची माफीही मागितली. " दरम्यान, दिग्दर्शकाच्या बोलण्यान काजोल नाराज झाली होती. त्यानंतर तिने तो सीन परफेक्ट केला असं तिने म्हटलं.
काजोलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ती मॉं या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. लवकरच ती नव्या कलाकृतीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.